Mother kills son by slitting his throat in Wagholi; Daughter seriously injured, accused mother arrested

वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाइफ रोड, वाघोली येथील पठाण हाईट्स इमारतीत मंगळवारी (दि. २७) सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून आईने आपल्या अल्पवयीन मुलाचा विळ्याने गळा कापून निर्घृणपणे खून केला, तर मुलीवरही जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष जायभाय (रा. पठाण हाईट्स, वाघोली) हे मागील आठ दिवसांपूर्वी पत्नी सोनी जायभाय व मुलांसह रफिक पठाण यांच्या इमारतीत भाड्याने राहण्यास आले होते. संतोष जायभाय यांचा मे २०१० मध्ये सोनी हिच्याशी विवाह झाला होता. ते पॉकलँड मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होते. मात्र, त्यांना दारूचे व्यसन असल्याने नवरा–बायकोमध्ये सतत वाद होत होते. याच कारणामुळे यापूर्वीच्या घरमालकाने त्यांना घर खाली करण्यास सांगितले होते. पतीकडून दुर्लक्ष होत असल्याने पत्नी सोनी जायभाय ही अनेक दिवस मानसिक तणावात होती.
दि. २६ जानेवारी २०२६ रोजी संतोष जायभाय दारू पिऊन घरी आल्यानंतर पुन्हा पत्नीशी भांडण झाले. त्यानंतर दि. २७ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ९ वाजता संतोष जायभाय पत्नीशी भांडण करून घराबाहेर निघून गेले. काही वेळाने घरातून मुलीचा जोरजोरात आरडाओरडा ऐकू आल्याने पठाण कुटुंबीय घटनास्थळी धावले. खिडकीतून पाहिले असता साईराज हा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला दिसून आला.
यावेळी सोनी जायभाय हिने तिचा मुलगा साईराज याचा विळ्याने गळा कापून खून केल्याचे तसेच मुलगी धनश्री हिच्या गळ्यावर वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. गंभीर जखमी झालेल्या धनश्रीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात महिला आरोपी सोनी संतोष जायभाय (वय २९) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे करत आहेत.