Administrator rule ends in Mumbai Municipal Corporation; After 44 years, BJP’s Ritu Tawde becomes Mayor unopposed, Sanjay Ghadi becomes Deputy Mayor

मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात आज महत्त्वाचा राजकीय टप्पा नोंदवला गेला. तब्बल ४४ वर्षांनंतर भाजपचा महापौर मुंबईला मिळाला असून, भाजप नेत्या रितू तावडे यांची बिनविरोध महापौरपदी निवड झाली. शिवसेना (एकनाथ शिंदे गट)चे संजय शंकर घाडी यांची उपमहापौरपदी निवड झाली. प्रशासक राज संपुष्टात येत महापौर राजची औपचारिक सुरुवात झाली आहे.
२२७ सदस्यीय सभागृहात महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर निवड अपेक्षितच मानली जात होती. ७ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. विरोधी पक्षांनी उमेदवार न दिल्याने विशेष सभेत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी रितू तावडे यांच्या निवडीची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा पार पडला.
रितू तावडे : भाजपच्या पहिल्या महिला महापौर
५३ वर्षीय रितू तावडे या घाटकोपर पूर्व मतदारसंघातून तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात करून त्यांनी २०१२ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. शिक्षण समिती अध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले असून पाणीटंचाई, करवाढ, फेरीवाले, स्वच्छता या मुद्द्यांवर त्या आक्रमक राहिल्या आहेत. भाजपच्या मुंबईतील पहिल्या महिला महापौर म्हणून त्यांनी नवा राजकीय अध्याय सुरू केला आहे.
संजय घाडी उपमहापौर
वॉर्ड क्रमांक ५ (दहिसर–मागाठाणे) येथील ज्येष्ठ नगरसेवक संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड झाली. २०२२ मधील शिवसेना फुटीनंतर ते एकनाथ शिंदे गटात सामील झाले. महायुती करारानुसार उपमहापौरपद सव्वा वर्षासाठी त्यांच्या ताब्यात राहणार आहे.
पहिल्याच दिवशी सभागृहात गोंधळ
महापौर आणि उपमहापौर यांच्या भाषणादरम्यान सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घोषणाबाजी झाली. काँग्रेसच्या महिला नगरसेवकांना बसायला जागा न दिल्याचा आरोप करण्यात आला. ठाकरेंच्या गटातील नगरसेवकांनी उपमहापौर संजय घाडी यांच्या भाषणाची प्रत फाडून वॉकआऊट केला.
किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाच्या नगरसेवकांच्या “बॉडी लँग्वेज”वर टीका केली. तर उपमहापौर संजय घाडी यांनी लोकशाहीला साजेशी भूमिका घ्यावी, असे आवाहन करत विरोधकांवर पलटवार केला.
मनसेची प्रतिक्रिया
मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी सभागृहातील नियोजनावर प्रश्न उपस्थित करत २२७ नगरसेवक असूनही बसण्याची व्यवस्था का नव्हती, असा सवाल केला.