Bloodshed on the Pune-Solapur highway! A pickup hit a two-wheeler and a coyote attacked; Revenge of a double murder after four and a half years?

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुकादमवाडी (ता. दौंड) येथे शुक्रवारी (ता. २०) रात्री तरुणाचा धारदार शस्त्रांनी निर्घृण खून (Pune Solapur Highway crime) करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्या उर्फ महेश संजय भागवत (वय २९, रा. पाटस, ता. दौंड) हा शुक्रवारी रात्री महेश मारूती टुले, युवराज शिंदे व राज होले यांच्यासमवेत दुचाकीवरून पाटसकडे जात होता. मुकादमवाडी पुलावर आल्यानंतर आनंद माकर, विकी शितकल व संतोष शितकल यांनी पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत चौघेही महामार्गावर कोसळले.
यानंतर संशयित आरोपींनी महेश भागवत याच्यावर कोयता व इतर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या भागवत याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
याबाबत महेश मारूती टुले (रा. पाटस) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आनंद माकर, विकी शितकल, संतोष शितकल (रा. अंबिकानगर, पाटस, ता. दौंड) तसेच त्यांच्या अन्य दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक गोपाळ पवार तपास करीत आहेत.
दरम्यान, ४ जुलै २०२१ रोजी पाटस येथे शिवम संतोष शितकल व गणेश रमेश माकर या दोन युवकांचा तलवारीने वार करून व डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. त्या दुहेरी खून प्रकरणात मृत महेश संजय भागवत याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. सुमारे साडेचार वर्षांनंतर सूडभावनेतून ही हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास सुरू आहे.