संघटन बळकटीसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही
Hon. A. Sanjay Jagtap appointed as BJP West Maharashtra Secretary

पुणे : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या नव्या प्रदेश कार्यकारिणीत मा. आ. संजय जगताप यांची पश्चिम महाराष्ट्र विभागीय चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष संघटनाला नवे बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.
प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर मा. आ. संजय जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. पक्षाने सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत संघटन अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीवेळी सरचिटणीस निरंजन डावखरे, राजेश पांडे, आमदार परिणय फुके, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, आमदार सुनील राणे, महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ तसेच माजी आमदार कुणाल पाटील आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, लागोपाठ लागलेल्या निवडणुकांमुळे कार्यकारिणीची घोषणा उशिरा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करून नव्या कार्यकारिणीची रचना करण्यात आली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भाजपची विचारधारा तळागाळात अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय भूमिका बजावणारे मा. आ. संजय जगताप यांना मिळालेली ही जबाबदारी आगामी काळात संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे समन्वय आणि निवडणूक तयारीसाठी महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा पक्ष वर्तुळात आहे.