
शेळ्या-मेंढ्यांमधील गंभीर व संसर्गजन्य विषाणूजन्य रोग असलेल्या पीपीआर च्या प्रतिबंधासाठी राज्यात ०१ मार्च २०२६ ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत प्रतिबंधात्मक लसीकरण फेरी-३ राबविण्यात येणार आहे.
केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ्य व रोगनियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत १०० टक्के केंद्र पुरस्कृत गंभीर पशुरोग नियंत्रण योजनेतून राज्यातील ९० लाख ६८ हजार शेळ्या व २८ लाख ३५ हजार मेंढ्या अशा एकूण १ कोटी १९ लाख ३ हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात येणार आहे.
सन २०३० पर्यंत देशातून पीपीआर रोगाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट असून, ४ महिन्यांवरील सर्व शेळ्या-मेंढ्यांना दरवर्षी लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहीम ४५ दिवसांत पूर्ण करण्यासाठी शीतसाखळी व्यवस्था, गावनिहाय सूक्ष्म नियोजन, जनजागृती व अतिरिक्त मनुष्यबळाची तयारी करण्यात आली आहे.
डॉ. रामास्वामी एन, सचिव पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यविकास विभाग तसेच डॉ. प्रवीणकुमार देवरे, आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र शासन यांनी सर्व मेंढपाळ व शेळीपालकांनी आपल्या पशुधनाचे पीपीआर प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.