Take action against those involved in black marketing of gas.

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या प्रशासनाला सुचना
पुणे : शहरात गॅस सिलेंडरचा कोणत्याही प्रकारे काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिल्या.
गॅस पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेताना त्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शहरातील परिस्थितीची माहिती घेतली.
महापौर नागपुरे यांनी घेतलेल्या आढाव्यानुसार पुणे शहरात गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असून दररोज सुमारे १० हजार सिलेंडरचे वितरण नियमितपणे करण्यात येत आहे. शहरातील सुमारे ८५ टक्के सिलेंडर बुकिंग ओटीपी प्रणालीद्वारे होत असून गॅस कंपन्यांकडून २५ दिवसांच्या नियमानुसार वेळेत डिलिव्हरी दिली जात आहे.
गॅस वितरण कंपन्यांच्या समन्वयातून नागरिकांना नियमितपणे गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जाऊन सिलेंडरची अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहनही नागपुरे यांनी केले.
गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून पुरवठा व्यवस्थेवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.