शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड· मोठा साठा जप्त

Photo of author

By Sandhya

Ration distribution department’s crackdown exposes black market of gas cylinders in Worli; large stock seized

वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला.
रहिवासी भागात धोकादायक पद्धतीने सिलिंडर साठवून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा प्रकार या कारवाईत उघडकीस आला.
नियंत्रक शिधावाटप कार्यालयाच्या फिरत्या पथकाने आणि कार्यालय क्रमांक २१ च्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. वरळी नाका येथील गणपतराव कदम मार्गावरील ‘सूरज वल्लभदास चाळ’ परिसरात गॅस सिलिंडरची अवैध साठेबाजी करून चढ्या दराने विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने तातडीने छापा टाकत अवैधरित्या साठवलेले सिलिंडर जप्त केले.
या कारवाईत एचपी गॅस कंपनीचे पाच किलोचे सहा भरलेले आणि ५८ रिकामे सिलिंडर हस्तगत करण्यात आले. तसेच सुपर गॅस कंपनीचे चार किलोचे ६४ भरलेले आणि १२ किलोचे १९ भरलेले सिलिंडर जप्त करण्यात आले. याशिवाय १२, चार आणि दोन किलोचे विविध आकाराचे २५ रिकामे सिलिंडरही सापडले.
हे सिलिंडर बेकायदेशीररीत्या रिफिलिंग करून काळ्या बाजारात विकण्यासाठी ठेवण्यात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल पुढील फौजदारी कारवाईसाठी वरळी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे. रहिवासी भागात अशा प्रकारे सिलिंडर साठवणे आणि त्यांची बेकायदेशीर विक्री करणे अत्यंत धोकादायक असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
ही कारवाई नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विभागाची पथके २४ तास सतर्क असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page