The Shikhar Shingnapur Yatra concludes with the Karha Jalabhishekam in Saswad’s Kavad…. The difficult Mungi Ghat is crossed with the chants of ‘Har Har Mahadev’… Varunraja performs Jalabhishekam on the Kavad

Photo of author

By Sandhya

सासवडच्या कावडीतील कऱ्हा जलाभिषेकाने शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता…. अवघड मुंगी घाट ‘हर हर महादेव’च्या जयघोषात सर… वरूणराजाकडून कावडींना जलाभिषेक


सासवड : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूरचा अवघड मुंगी घाट सर करीत मराठी मुलखातील शेकडो कावडींतील पाण्याने मोठ्या महादेवाला जलाभिषेक करण्यात आला. या यात्रेतील प्रथम मानाची समजली जाणारी आणि केवळ मानवी हातांच्या साखळीने अवघड मुंगी घाट सर करणारी सासवड येथील श्री संत भुतोजीबुवा तेली यांच्या कावडीतील पवित्र कऱ्हेच्या पाण्याने सोमवारी शिवलिंगाला अभिषेक (धार घालणे) होऊन या यात्रेची सांगता झाली. यंदा वरुणराजाने जोरदार हजेरी लावत शंभो महादेवाच्या सर्व कावडी आणि शिवभक्तांना जलाभिषेक केला. यामुळे साडेआठच्या सुमारास सासवडची मानाची श्री संत भुतोजीबुवा तेली यांची कावड घाटावर पोहोचली.

चैत्र शुद्ध बारसेला श्री क्षेत्र शिंगणापूर येथे लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत महादेवाला पाण्याची धार घालण्यासाठी शेकडो वर्षांपासून मराठी मुलखातील ७०० ते ८०० कावडी दरवर्षी येत असतात. यामध्ये श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर महादेवाचे परमभक्त सासवडच्या भूतोजीबुवा तेली यांचा प्रथम मान आहे. सातारचे छत्रपती श्रीमंत आबासाहेब महाराज यांनी २३ शेर वजनाचे १२ हंडे पाणी मावतील असे शुद्ध तांब्याचे दोन रांजण वाहिलेले आहेत. मोढवे (ता. बारामती) येथे पुरंदरे, फलटणमध्ये नाईक निंबाळकर घराण्यातील प्रतिनिधी कावडीची पूजा करतात. तर शिखर शिंगणापूर येथे छत्रपती शिवरायांचे वंशज सातारचे राजमाता कल्पनाराजे भोसले व खासदार छत्रपती उदयनमहाराज भोसले यांच्या वतीने विधिवत पूजा, कावडीच्या भुतोजी बुवा तेली यांना मानाचा विडा व दक्षिणा दिली जाते. तसेच राजघराण्यामार्फत कावडीस भगवे निशाण व ३५ हात ध्वजाचे जरी-पागोटे दिले जाते. हा मान शिवकाळापासून चालत आला असून आजतागायत ही परंपरा चालू आहे.
दरम्यान, रामनवमीला रात्री उशिरा कावडीने सासवडहून शिखर शिंगणापूर यात्रेसाठी प्रस्थान ठेवले. जेजुरी, कोळविहीरे, मोढवे, वाकी, वडगाव, जिंती, फलटण, विडणी, आंदरुड, कोथळे आणि मुंगी घाट मार्गे शिखर शिंगणापूर असा प्रवास झाला. सोमवारी दुपारी चार वाजता कोथळे येथील बारसीच्या ओढ्यात तेल्या भुत्याच्या सासवड आणि कोथळेच्या कावडीच्या भेटीचा सोहळा झाला. त्यानंतर साडेपाच वाजता घाटाच्या पायथ्याला आरती होऊन हजारो शिवभक्तांसह कावडीने मुंगी घाट चढण्यास सुरुवात केली. यावेळी माजी आमदार संजय जगताप, कैलासबुवा कावडे, सासवडचे पाटील संग्राम जगताप, कावड मंडळाचे अध्यक्ष संजय द. जगताप, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप यांसह सासवड व पंचक्रोशीतील हजारो शिवभक्त उपस्थित होते. घाटाचे अवघड तीन टप्पे केवळ मानवी हातांच्या साखळीने सर केले. हा सोहळा पाहण्यासाठी घाटावर लाखो भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी ठिक साडेसात वाजता घाटावर आली. यावेळी विविध वाद्यांच्या सुरावटीत, टाळ्यांच्या कडकडाटात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आणि लाखो भाविकांच्या शिवनामाच्या गजरात या मानाच्या कावडीचे स्वागत झाले.
मुंगी घाटाने कावड शिवालयाजवळ पोहोचल्यावर सातारचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजघराण्यामार्फत कावडीची विधिवत पूजा होऊन भुतोजी बुवा तेली यांना मानाचा विडा व दक्षिणा तसेच कावडीस भगवे निशाण व ३५ हात ध्वजाचे जरी-पागोटे देण्यात आले. मंदिरातील चावडीवर बाजा म्हणजेच वाद्यकाम झाले. यावेळी सासवडच्या मानकरी भोंडे मंडळींचे बाजकाम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. देवस्थान कमिटीच्या वतीने बाजकाम करणाऱ्यांना मानाचा विडा व दक्षिणा देण्यात आली. यानंतर कावडीच्या भेटी होऊन सासवड आणि खळदच्या भुतोजी बुवा तेली यांनी आणलेल्या कऱ्हेच्या पाण्याने मुख्य शिवलिंगास जलाअभिषेक होऊन यात्रेची सांगता झाली. सासवडचे पाटील संग्राम जगताप, कावडीचे भुतोजी कैलासबुवा कावडे, कावड मंडळाचे सदस्य आणि सासवडसह परिसरातील हजारो शिवभक्तांनी कावड पायी सोहळ्याचे काम पाहिले.

Leave a Comment

You cannot copy content of this page