

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी. खंडोबा देवाला दवण्या ची पूजा.
जेजुरी वार्ताहर दिनांक 2 चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी व कुलधर्म कुलाचार नुसार धार्मिक विधीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. चैत्र पौर्णिमा हा खंडोबा देवाचा अवतार दीन असल्याने देवाला प्रिय असणाऱ्या सुगंधी दवण्याची पूजा करण्यात आली.
खंडोबा देवाच्या वर्षाकाठी 10 यात्रा भरतात. चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरी, चित्रा नक्षत्र, वसंत ऋतु या शुभदिवशी श्री शंकरांनी मार्तंड भैरवाचा म्हणजे खंडोबा देवाचा अवतार धारण केला.पौराणिक काळापासून दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला जेजुरी नगरीत देवाचा अवतार दिनानिम्मित मोठी यात्रा भरते.
विशेषतः या यात्रेस बहुजन बांधव व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने भाविक जेजुरी गडावर आले होते . आलेल्या भाविक-भक्तांकडून कुलधर्म कुलाचार केला जात होता.
तसेच गावोगावच्या शिखर काठ्या वाजत गाजत देव भेटीसाठी जेजुरी गडावर भाविकांनीआणल्या होत्या .शिखर काठ्यांची देव भेट होताच हजारो भाविकांनी देवाचे लेण असणारा भंडारा उधळून येळकोट येळकोट जयमल्हार, सदानंदाचा येळकोट असा खंडोबा देवाचां जयघोष केला.
दवणा सुगंधी वनस्पती.
जेजुरीचा खंडोबा,कोल्हापूरचा ज्योतिबा,शिंगणापूरचा शंभू महादेव,कार्ला येथील एकवीरा व गावोगावच्या भैरवनाथाला दवणा प्रिय आहे. गुढी पाडवा ते चैत्र महिन्यात देवाला सुगंधी दवना अर्पण करण्याची पूर्वी पासून प्रथा आहे.
जेजुरीच्या खंडोबा देवाला फळे,फुले, पाने,धान्य,भात, दवणा आदींच्या सप्त पूजा केली जाते.
चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारा व गडकोटामध्ये फुलांची आकर्षक सजावट करून श्री खंडेरायास प्रिय असणारा दवणा अर्पण करून महापूजा करण्यात आली. देवाचे मानकरी सचिन झगडे यांनी देवाला हा दवणा अर्पण केला.
चैत्र पौर्णिमा यात्रेस भाविकांची संख्या रोडावली.
जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी दहा यात्रा भरतात. वर्षभरात सुमारे 50 लाखाहून अधिक भाविक येत असतात. विशेषतः चैत्र पौर्णिमा व खंडोबा देवाचा अवतारदीन असल्याने या यात्रेसाठी भाविकांची गर्दी होते. मात्र सध्या गावोगावच्या सुरू असलेल्या जत्रा, शालेय परीक्षा, कडक उन्हाळा, अचानक येणारा अवकाळी पाऊस यामुळे भाविकांची संख्या लक्षणीय घटली होती.
चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरी गडावर देवदर्शन, तळी भंडारा चां धार्मिक विधी, पुजारी वर्गाच्या निवासस्थानी व ऐतिहासिक चिंचेच्या बागेत जागरण गोंधळ आदी विधी भाविक करतानाचे चित्र पाहण्यास मिळाले.
भाविकांच्या अनुषंगाने शहरातील बाजार पेठ भाविकांनी फुलून गेली होती. मात्र भाविकांची संख्या कमी असल्याने त्याचा परिणाम येथील बाजारपेठेत दिसून आला.