
“कामगारांच्या हक्कांवर डाका टाकणाऱ्या सरकारचा इंटककडून तीव्र निषेध!” – विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात काळा दिवस आंदोलन
पुणे जिल्हा राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) यांच्या वतीने दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी “काळा दिवस (ब्लॅक डे)” म्हणून पाळण्यात आला. केंद्र व राज्य सरकारने कामगार विरोधी धोरणे राबविल्याच्या निषेधार्थ हा आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष जी. संजीव रेड्डी व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चे प्रदेशाध्यक्ष कैलास भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या प्रसंगी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले. पुणे जिल्हा इंटकचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे निवेदन दिले.
यावेळी विजय जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चेदरम्यान सविस्तरपणे हा “काळा दिवस” का पाळण्यात येत आहे, तसेच कामगार संघटनांच्या वतीने या आंदोलनामागील भूमिका आणि कारणे यांची सखोल माहिती निवेदनाच्या माध्यमातून स्पष्ट केली. कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हे आंदोलन अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. ही बाब या आंदोलनाची विशेष ठरली.
केंद्र सरकारने दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी कामगार हिताचे तब्बल २९ कायदे रद्द करून त्याऐवजी चार नवीन श्रम संहिता (काळे कायदे) लागू केले. या निर्णयामुळे कामगारांच्या हक्कांवर गदा येत असून, त्यांच्या सुरक्षिततेवर व भविष्यावर परिणाम होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या आंदोलनाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये महिला इंटक अध्यक्षा शितल कोतवाल, पुणे जिल्हा इंटक कार्याध्यक्ष शंकर जाधव, उपाध्यक्ष गोविंदराव अटक, संग्राम जाधव, प्रवक्ते धनंजय माळवे तसेच दगडू पवार, पोपटराव चौगुले, श्री विटकर, अनिल लगस, सचिव प्रकाश सावंत व सचिन गोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने कामगार विरोधी निर्णय तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.