

नागरिकांशी थेट संवाद; स्थानिक प्रश्नांवर चर्चा, विकासाचा दिलासा.
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा वाढता प्रतिसाद
बारामती : आगामी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरातील विविध प्रभागांमध्ये प्रभाग भेट दौऱ्याचे (घोंगडी बैठकीचे) वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून प्रभागामध्ये प्रभाग भेट दौऱ्याला (घोंगडी बैठकीला) सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण इंगळे यांनी दिली. १ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान हा दौरा पार पडणार असून, नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात आला आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीस स्मरण करून, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा खासदार पार्थ पवार, युवा नेते जय पवार यांच्या सूचनेनुसार प्रभाग भेट दौऱ्याचे (घोंगडी बैठकीचे) आयोजन करण्यात आले आहे.या प्रभाग भेट दौऱ्यामध्ये बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण इंगळे, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, माजी नगराध्यक्ष इम्तियाजभाई शिकीलकर ,युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे, विद्यार्थी अध्यक्ष मेघराज माने, राष्ट्रवादी शहर कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी (PRO) सुरज देवकाते, बारामती नगर परिषदेचे गटनेते, उपगटनेते, सभापती, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, सर्व सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. प्रत्येक प्रभागात सभा, भेटीगाठी आणि संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील विविध भागांमध्ये जाऊन स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, तसेच पक्षाची भूमिका आणि विकासाची दृष्टी स्पष्ट करणे, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
असा आहे प्रभाग भेट दौरा….
१ एप्रिल रोजी भैरवनाथ मंदिर तांदुळवाडी , बौद्ध विहार, राम मंदिर राम गल्ली, सावित्रीबाई फुले सभागृह पान गल्ली, परिसरात प्रभाग भेट दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर २ एप्रिल रोजी, राष्ट्रवादी भवन कसबा, मोरया नगर ओपन स्पेस गणपती मंदिर शेजारी, अवचट इस्टेट गणपती मंदिर शेजारी, अनंत फ्लावर गार्डन माऊली नगर, शुक्रवार ३ एप्रिल रोजी महात्मा फुले समाज मंदिर पाटस रोड, क्षेत्रीय कार्यालय टकार कॉलनी, तांदुळवाडी वेस चौक विठ्ठल मंदिर शेजारी, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर होलार समाज मंदिर, शनिवारी ४ एप्रिल रोजी पिडीसी बँक जवळ सेफी वुमन शेजारी, राष्ट्रवादी शहर पक्ष कार्यालय शारदा प्रांगण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत ओपन स्पेस, बुरुड हाउसिंग सोसायटी समाज मंदिर, बौद्ध विहार सिद्धार्थनगर, रविवार ५ एप्रिल रोजी खंडोबा नगर चौक, जामदार रोड, राष्ट्रवादी भवन कसबा, माळेगाव कॉलनी दत्त मंदिर, मंगळवार ७ एप्रिल रोजी महिला सोसायटी ओपन स्पेस, सूर्यनगरी ओपन स्पेस, गावठाण काळेश्वर मंदिर जळोची, देसाई इस्टेट गणपती मंदिर, श्री गणेश मंदिर कांचन नगर, रुई गाव मारुती मंदिर, बुधवार ८ एप्रिल रोजी सिद्धिविनायक मंदिर अशोक नगर, दत्त मंदिर कृषी देवता नगर, दत्त मंदिर वसंत नगर, अशोक नगर गणपती मंदिर, या ठिकाणी बारामती शहर राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने प्रभात भेट दौरा (घोंगडी बैठक) पार पडणार आहे .राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नियोजित दौऱ्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक नागरिकांकडूनही या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येत्या काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र आहे.