
पुणे: शहरात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यात सिंहगड रोडवरील नवश्या मारुती परिसरात फुलविक्रेत्या ज्येष्ठ महिलेच्या अंगावर झाड पडून तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रंजना नवनाथ गिरी (वय 60, रा. गणेश मळा, दत्तवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे.
गिरी यांचा फुलविक्रीचा व्यवसाय होता. पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिंहगड रोडवरील नवश्या मारुती मंदिराच्या मागील गल्लीत त्यांचे छोटेसे दुकान होते, जे झाडालगतच होते. गुरुवारी झालेल्या मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे परिसरातील मोठे झाड अचानक उन्मळून गिरी यांच्या अंगावर कोसळले. या घटनेत त्या झाडाखाली अडकल्या.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाड बाजूला करून महिलेला बाहेर काढले व तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अवकाळी पावसाच्या तडाख्याने शहरातील विविध भागांत 82 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. वारजे, रविवार पेठ, पाटील प्लाझा, सॅलिसबरी पार्क या ठिकाणी पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. झाडपडीमुळे नागरिकांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर एका ठिकाणी सीमा भिंत कोसळली.
सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील विविध भागांत 82 ठिकाणी झाडपडीच्या तर सहा ठिकाणी पाणी शिरल्याच्या घटनांची नोंद झाली होती. तसेच, एका ठिकाणी सीमा भिंत कोसळ्याची वर्दी होती. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम करत होते.
कोंढवे- धावडे भीमनगर येथील राधिका अपार्टमेंटच्या टेरेसवरील फ्लॅटचे लोखंडी पत्रा व अँगलचे छत वाऱ्यामुळे उडून रस्त्यावर पडले होते. जवानांनी घन, कटावणी आणि ग््राँडरच्या साहाय्याने कापून रस्ता मोकळा केला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.