
नीरा नदी प्रदूषणाबाबत होत असलेल्या आरोपांना श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या प्रशासनाने फेटाळून लावले आहेत. कारखान्याकडून कोणत्याही प्रकारचे सांडपाणी किंवा केमिकलयुक्त पाणी नीरा नदीत सोडले जात नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. काही व्यक्तींनी कोणताही ठोस पुरावा नसताना चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवून कारखान्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
काही दिवसापूर्वी नीरा नदीत हजारो मासे मरून पडले होते.यानंतर सोमेश्वर कारखान्याने नदीत प्रदूषित पाणी सोडल्याने हे मासे मेल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला होता. यानंतर सोमेश्वर कारखान्याच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात अत्याधुनिक इफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट (ETP) कार्यरत असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकल्पात प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय अशा तीन टप्प्यांत सांडपाण्याची शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया केलेले पाणी पूर्णतः सुरक्षित असून त्याचा पुनर्वापर केला जातो. ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पनेनुसार कारखाना कार्यरत असल्याचेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले.
कारखाना उत्पादनाबरोबरच पर्यावरणीय जबाबदारी जपत कारखान्याने विविध उपक्रम राबवले आहेत. राज्यात उच्चांकी गाळप व साखर रिकव्हरी साध्य करताना सभासद शेतकऱ्यांना स्पर्धात्मक व समाधानकारक दर देण्याची परंपरा कारखान्याने कायम ठेवली आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सुमारे ३५ एकर क्षेत्रात ‘नक्षत्र वनउद्यान’ विकसित करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत सुमारे ५५०० देशी व पर्यावरणपूरक झाडांची लागवड करण्यात आली असून, त्यापैकी २.५ एकर क्षेत्रात मियावाकी पद्धतीने घनदाट वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील जैवविविधतेत वाढ होण्यास मदत होत असल्याचे कारखाना प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. कारखाना प्रशासन प्रदूषण होऊ नये यासाठी पूर्णतः घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.