Shocking incident in Daund taluka: Brutal murder of 9-year-old girl by father

Photo of author

By Sandhya

दौंड तालुक्यात थरकाप उडवणारी घटना : वडिलांकडून ९ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या

दौंड : शाळेच्या गुणपत्रिकेवरून झालेल्या किरकोळ वादातून वडिलांनीच आपल्या ९ वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वडिलांसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शांताराम दुर्गाधन चव्हाण (वय ३३) आणि चिंगु शिंदाबाद भोसले (दोघे रा. हनुमान वस्ती, काळे वस्ती जवळ, देऊळगाव राजे, ता. दौंड, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. शांताराम चव्हाण याची ९ वर्षांची मुलगी अनामिका हिने तिच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

या रागातून चव्हाण याने घरातील लाकूड कापण्याच्या मशीनने मुलीच्या गळ्यावर, डोक्यावर व गालावर वार करून तिची निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे तर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून घर पेटवून दिले. आगीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आला.

ही घटना ३ मे २०२६ रोजी पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली. त्या वेळी घरात उपस्थित असलेल्या चिंगु भोसले हिनेही ही घटना लपवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

दौंड पोलीस ठाण्याचे पोलिस शिपाई निलेश फडणीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तसेच इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले करत आहेत.

या अमानुष घटनेमुळे संपूर्ण दौंड तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाची तीव्र भावना निर्माण झाली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page