
दौंडमधील आत्महत्याप्रकरणी तेरा जणांविरुद्ध गुन्हा
शहरातील ज्येष्ठ नागरिक विवेक गटणे (वय ७०) यांनी आर्थिक फसवणुकीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी तेरा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेक गटणे यांची दीड कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली होती. या आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून त्यांनी सोमवारी (ता. ११) गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृत्यूपूर्वी गटणे यांनी एका वहित त्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावे तसेच आर्थिक व्यवहारांची सविस्तर नोंद करून ठेवली होती. या नोंदीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी राजू भीमराव बारस्कर, संजय भीमराव बारस्कर, प्रकाश आवाजी भोसले, आरिफ शमसुद्दीन शेख, शंकर रमेश वाघमारे, अक्तर अहमद शेख (सर्व रा. दौंड) तसेच आदित्य सुधीर जगताप (रा. पुणे) यांच्यासह इतर आरोपींचा समावेश आहे. तसेच पुणे व मुंबई येथील खासगी वित्तीय कंपनीतील एका महिलेसह एकूण सहा जणांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
आरोपींनी गटणे यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू घेतल्या, मात्र त्या परत न करता त्यांना मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक गोपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, विवेक गटणे यांनी शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.