

सासवडमध्ये ‘पुरंदर कृषी एक्स्पो २०२६’ची तयारी पूर्ण… आजपासून कृषी महोत्सवाला सुरुवात
१६० व्यावसायिक स्टॉल्स, आधुनिक तंत्रज्ञान आणि ट्रॅक्टरचे बंपर बक्षीस; शेतकऱ्यांचे वेधले लक्ष
सासवड : येथील शरद कृषी व पर्यावरण विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘पुरंदर कृषी एक्स्पो २०२६’ची तयारी आता पूर्ण झाली आहे. प्रदर्शनस्थळी स्टॉल उभारणी, आधुनिक यंत्रसामग्रीची मांडणी आणि विविध विभागांचे सजावटीचे काम युद्धपातळीवर अंतिम टप्प्यात आले आहे. २२ ते २५ मे दरम्यान सासवड येथील शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या भव्य कृषी प्रदर्शनाकडे संपूर्ण जिल्हयातील शेतकरी, कृषी उद्योजक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या चार दिवसीय कृषी महोत्सवात आधुनिक कृषी तंत्रज्ञान, एआय आधारित शेती उपाय, ड्रोन फवारणीची थेट प्रात्यक्षिके, आधुनिक कृषी यंत्रसामग्री, बियाणे, खते, प्रगत सिंचन व्यवस्था, पशुपालन तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांचे स्टॉल्स सज्ज करण्यात येत आहेत. तब्बल १६० व्यावसायिक स्टॉल्स आणि ५० महिला बचत गटांचे स्टॉल्स हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.
प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मैदानावर भव्य विद्युत व्यवस्था, विस्तीर्ण पार्किंग, चोख सुरक्षा, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सभागृह उभारण्यात आले आहे. महोत्सवात दररोज कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पशुधन प्रदर्शन आणि विविध कृषी स्पर्धा रंगणार आहेत. विशेष म्हणजे, प्रदर्शनात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दररोज लकी ड्रॉद्वारे कृषी अवजारे दिली जाणार असून, शेवटच्या दिवशी ट्रॅक्टर आणि ट्रेलरचे भव्य बंपर बक्षीस ठेवण्यात आले आहे.
आयोजक माजी आमदार संजय जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी
जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक डॉ. एम. एस. जाधव, प्रकाश पवार, संभाजी गरुड, विलास जगताप व सहकारी जय्यत तयारी करीत आहेत.
”पुरंदर आणि परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची योग्य दिशा मिळावी, तसेच जागतिक पातळीवरील नवीन तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, हाच या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.”
संजय जगताप, माजी आमदार (आयोजक)