


पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेल्या वाहनांना अखेर ‘घरचा रस्ता’
बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याचा स्तुत्य उपक्रम; ५ लाखांची १३ बेवारस वाहने मूळ मालकांच्या ताब्यात, आणखी ५० वाहनांसाठी शोधमोहीम वेगात
पोलीस ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्षे धूळ खात पडून असलेल्या मुद्देमालातील तसेच बेवारस वाहनांना अखेर न्याय मिळाला आहे. बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनने राबविलेल्या विशेष मोहिमेत तब्बल १३ वाहनांचा शोध घेऊन ती मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आली. पोलिसांच्या या पुढाकारामुळे अनेक वाहनमालकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले असून पोलिसांप्रती विश्वासही निर्माण झाला आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्याच्या परिसरात पडून असलेल्या वाहनांची इंजिन व चेसिस क्रमांकाच्या आधारे पडताळणी करण्यात आली. काही वाहनांचे नंबर अस्पष्ट झाले होते, तर काही वाहनांची अवस्था अतिशय खराब झाली होती. तरीही पोलिसांनी आरटीओ नोंदी, जुने गुन्हे रेकॉर्ड आणि कागदपत्रांचा आधार घेत संबंधित मालकांचा शोध घेतला.
वाहनांची ओळख पटविल्यानंतर संबंधित मालकांना संपर्क करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि त्यानंतर ही वाहने मालकांच्या स्वाधीन करण्यात आली. अनेक वाहनमालकांनी वर्षानुवर्षे आपली वाहने मिळण्याची आशाच सोडली होती. मात्र पोलिसांच्या या मोहिमेमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलीस ठाण्यांच्या आवारात मोठ्या प्रमाणावर बेवारस वाहने पडून राहत असल्याने जागेची कमतरता निर्माण होते. शिवाय अनेक वाहने पावसात-उन्हात खराब होत जातात. त्यामुळे अशा वाहनांची योग्य तपासणी करून ती मूळ मालकांना परत देण्याचा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
या सर्व वाहनांची अंदाजे किंमत सुमारे ५ लाख २० हजार रुपये इतकी असून, येत्या काही दिवसांत आणखी ५० बेवारस वाहनांचा शोध घेऊन तीही मूळ मालकांच्या ताब्यात देण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
ही आहेत वाहने आणि त्याचे मालक:
बाळासाहेब आल्हाट, रा. माळेगाव बुद्रुक ता. बारामती MH-42 X-1912, किशोर दळवी, रा. दहिगाव ता. माळशिरस MH-45 Z-2285, विशाल निंबाळकर, रा. फरतडवाडी ता. फलटण MH-11 BF-8469, शरद भगवान गरुड, रा. वाल्हे ता. पुरंदर MH-12 GJ-2373, किरण सतीश जराड, रा. माळेगाव बुद्रुक शिवनगर ता. बारामती MH-42 AK-3270, रामदास धोंडीबा चव्हाण, रा. काळेवाडी ता. दौंड MH-42 R-2079, कुंडलिक जयसिंग घोरपडे, रा. कोळवीहरे ता. पुरंदर MH-12 GY-2034, अमर आजिनाथ भोसले, रा. झारगडवाडी ता. बारामती MH-42 AL-5526, सुनील दत्तात्रय कोकणे, रा. झारगडवाडी ता. बारामती MH-42 AL-4162, सदाशिव विश्वनाथ कोठाळे, रा. गोखळी ता. फलटण MH-11 CR-3374, अण्णा उत्तम चव्हाण, रा. कोपर्डी हवेली ता. कराड MH-50 E-7379, राजेंद्र वसंत आटोळे, रा. गोखळी ता. फलटण MH-42 AC-3771, नंदकुमार कोंडीबा लोंढे, रा. देऊळगाव रसाळ ता. बारामती MH-42 U-6205
पोलिसांच्या या कामकाजाबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त होत असून, 'पोलीस केवळ गुन्हे उघड करत नाहीत, तर नागरिकांच्या मालमत्तेची जबाबदारीही जपतात,' अशी प्रतिक्रिया वाहन मालकांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच कल्याण शिंगाडे,भारती खंडागळे,नितीन ढवाण,निलेश वाकळे यांनी केली.