
कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी हवालदील; कांदा रस्त्यावर फेकून देण्याऐवजी मोफत वाटप
सांगवी गावातील प्रगतशील शेतकरी भानुदास भगवान जगताप यांचा दानशूरपणा
माळेगाव – कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत.मात्र अशाच कठीण परिस्थितीत एका शेतकऱ्याने माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे.उत्पादन केलेला कांदा रस्त्यावर फेकून देण्याऐवजी त्यांनी गोरगरिबांना मोफत वाटून समाजासमोर दानशूरपणाचे उत्तम उदाहरण ठेवले आहे.सांगवी ता.बारामती येथे जिल्हा परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार मिळालेले प्रगतशील शेतकरी भानुदास भगवान जगताप असे दानशूर शेतकऱ्याचे नाव आहे.भानुदास जगताप हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रात कांदा हे पिक घेतले होते.कांदा लागवडी पासुन उत्पादन घेईपर्यंत पत्नी विमल जगताप व दोन मुले सिध्दार्थ व अमर जगताप यांनी खुप मेहनत घेतली.कांद्याचे चांगले उत्पादन झाले.साधारणपणे ५५ ते ६० किलोच्या ३५० पिशव्यांचे उत्पादन झाले.कष्टाने पिकवलेल्या कांद्याला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत.उत्पादन खर्चही निघत नसताना अनेक शेतकरी निराश झाले आहेत.अशा वेळी या शेतकऱ्याने निराश न होता सामाजिक बांधिलकी जपत सांगवी गावातील गरजू कुटुंबांना चक्क ५५ ते ६० किलो वजनाच्या तब्बल २७० कांद्याच्या गोणीचे मोफत वाटप केले.तसेच उन्हामुळे कांदा खराब झाल्याने इतर गोण्या शेतात खत म्हणून वापरण्यासाठी टाकला. त्यांच्या या कृतीमुळे समाजात माणुसकी अजून जिवंत असल्याचा संदेश मिळाला.शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून समाजाचा आधारस्तंभ आहे,हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.स्वतः आर्थिक संकटात असतानाही दुसऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येणे,ही मोठी दानशूर वृत्ती आहे. पैशापेक्षा माणुसकी मोठी असते,हे या शेतकऱ्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले.
शेतकऱ्यांचे मन फार मोठे आहे.शेती परवडत नसली तरी जगाचा पोशिंदा म्हणून काम करावे लागते.कांदा फेकून देण्याऐवजी त्याचे मोफत वाटप करणे पसंत केले.शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव द्यावा.हमी भाव मिळाला तरच शेती करता येईल.अन्यथा शेतकऱ्यांना जगणे मुश्किल होईल.
भानुदास भगवान जगताप – शेतकरी सांगवी ता.बारामती