
कल्याणच्या दुर्गाडी परिसरात तणाव; रस्त्यावर आरती, घोषणाबाजी! आंदोलक आक्रमक, बॅरिकेडसवर चढले, पोलिसांकडून धरपकड
कल्याणचा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आणि गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून धगधगत असलेला धार्मिक वाद यंदाच्या बकरी ईदच्या निमित्ताने पुन्हा एकदा पेटला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बकरी ईदच्या दिवशी हिंदू भाविकांना दुर्गाडीवरील मंदिरात प्रवेश बंदी घातली आहे. तर दुसरीकडे, वर्षातील इतर दिवशी किल्ला परिसरात कोणत्याही प्रकारच्या इस्लामी उपासनेला मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाच्या निर्णयाविरोधात शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
प्रशासनाने केलेल्या मनाई आदेशाविरोधात गुरुवारी सकाळीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर आक्रमक होत जोरदार आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दुर्गाडी किल्ल्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अटकाव करत ताब्यात घेतले. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून बॅरिकेट्सही उभे केले आहेत. या आंदोलनाच्या परिणामी परिसरात काहीशी तणावपूर्ण स्थिती आहे. यंदाच्या आंदोलनात दोन्ही शिवसेना गटांसोबत भाजपचे कार्यकर्तेही सहभागी झाल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
काय आहे नेमका वाद?
दुर्गाडी किल्ल्याच्या माथ्यावर ऐतिहासिक दुर्गा देवीचे मंदिर आहे, तर किल्ल्याच्या पायथ्याशी ईदगाह आहे. हिंदू संघटनांचा दावा आहे की हे मूळचे दुर्गा देवीचे स्थान आहे, तर मुस्लीम समाजाकडून तिथे ईदगाह असल्याचा दावा केला जातो. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ हा वाद सुरू असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
१९८२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ईदच्या दिवशी हिंदू भाविकांना होणाऱ्या प्रवेश बंदीला विरोध केला होता. त्यांच्याच आदेशानुसार १९८६ मध्ये तत्कालीन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ‘घंटानाद आंदोलन’ सुरू केले होते. तेव्हापासून दरवर्षी बकरी ईदला येथे आंदोलनाची ठिणगी पडते.
सध्या न्यायालयाचा अंतिम निकाल प्रलंबित असल्याने प्रशासनाकडून येथे तात्पुरती व्यवस्था केली जाते. सुरक्षेचा उपाय म्हणून राज्य राखीव पोलीस दलाची / तुकडी आणि स्थानिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला आहे.