
भिवंडीचे नारपोली पोलीस ठाणे बॉम्बने उडवण्याचा कट उधळला, यूपीच्या एटीएस पथकाने केलेल्या कारवाईत खळबळजनक माहिती
वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील झोपडय़ा तोडताना बेकायदा मशीदही उद्ध्वस्त करण्यात आली होती. त्याचा बदला म्हणून भिवंडीतील नारपोली पोलीस ठाणे बॉम्बने उडवण्याचा कट आखण्यात आला होता. मात्र हा कट उधळला गेला आहे.
उत्तर प्रदेशातील एटीएसच्या पथकाने केलेल्या कारवाईत दोघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्या तपासात ही खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.
उत्तर प्रदेशमधील एटीएसच्या पथकाने दानिलाल अशरफ व कृष्णा मिश्रा यांना ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी केली असता,अनेक स्फोटक माहिती समोर आली आहे. अशरफ याने तर नारपोली पोलीस ठाण्याचे फोटो व त्याजवळील मेट्रो पुलाचा 18 सेकंदाचा व्हिडीओ तयार करून पाकिस्तानातील हँडलर्सना पाठवल्याचा आरोप आहे. त्याशिवाय नारपोली पोलीस ठाणे व त्याच्या सुरक्षा व्यवस्थेची संवेदनशील माहिती गोळा करण्याची कामगिरीही त्याच्यावर सोपवण्यात आली होती.
प्रवेशद्वाराजवळ कडक सुरक्षा
एटीएसच्या कारवाईतील धक्कादायक माहिती समजल्यानंतर तातडीने नारपोली पोलीस ठाण्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारासमोरच गोण्यांची थप्पी लावून संरक्षक भिंत उभारण्यात आली असून येथे 24 तास सशस्र पोलीस व अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. त्याशिवाय पोलीस ठाण्यात येणाऱया व जाणाऱया प्रत्येक व्यक्तीवर बारकाईने लक्ष ठेवले असून परिसरातील गस्तही वाढवण्यात आली आहे.
तरुणांना पैशांचे आमिष दाखवून रेकी
उत्तर प्रदेशातील एटीएस पथकाने ताब्यात घेतलेल्या दोघांचे नेटवर्क थेट भिवंडीच्या नारपोली पोलीस ठाण्यापर्यंत कसे काय पोहोचले याचा तपास केला जात आहे. या नेटवर्कचे कथित संबंध 'तेहरिक-ए-तालिबान हिंदुस्थान' आणि शहजाद भट्टी याच्याशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तरुणांना पैशांचे आमीष दाखवून संवेदनशील ठिकाणांची रेकी केली जात असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.