More than three lakh devotees throng Jejuri fort on the occasion of Somvati Yatra

Photo of author

By Sandhya

सोमवती यात्रेनिमित्त जेजुरी गडावर तीन लाखाहून अधिक भाविकांची गर्दी
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या सोमवती यात्रेनिमित्त लाडक्या खंडोबा देवाचे देवदर्शन आणि कन्हा स्नान, कुलधर्म कुलाचारासाठी ऐतिहासिक जेजुरीनगरीत तीन लाखांहून अधिक भाविकांची गर्दी झाली होती. खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्यावेळी मंदिर गडकोटांसह कऱ्हा नदीतीरी भंडाराची उधळण करीत, ‘सदानंदाचा येळकोट… येळकोट’, ‘जय मल्हार’ असा जयघोष भाविकांनी केला.

 दीड वर्षानंतर सोमवार (दि. 15  )  रोजी सोमवती यात्रा भरली होती. यामुळे राज्यातील विविध ठिकाणावरून आलेल्या सुमारे तीन लाखाहून अधिक भाविकांनी देवदर्शनासाठी मोठी गर्दी होती.  सोमवार दिनांक 15 रोजी पहाटे दोन वाजता देवाचे मानकरी  पेशवे इनामदार तसेच खोमणे, माळवदकर पाटील यांनी इशारा करताच पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. या वेळी देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून आणि हवाई फटाक्यांची आतषबाजी करून सोहळ्याला सलामी देण्यात आली. पालखीसमोर निशाण, छत्रचामरे अब्दागिरी तसेच घडशी समाजबांधवांच्या वतीने सनईचे मंगलमय सूर निनादत होते. पहाटे दोन वाजता जेजुरी गडावरून पालखी सोहळा मार्गस्थ होताना लाखो भाविक उपस्थित होते.

पालखी सोहळ्याची मंदिर प्रदक्षिणा होताच भंडारगृहातील श्रीखंडोबा व म्हाळसादेवीची उत्सवमूर्ती पालखीत ठेवण्यात आली व पालखी सोहळा गडावरून निघताच हजारो भाविकांनी 'येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत खंडोबा देवाचे लेणं असणारा पिवळ्या जर्द भंडाऱ्याची उधळण केली. संपूर्ण गड परिसर भंडाराने न्हाऊन निघाला. देवा तुझी सोन्याची जेजुरीचा प्रत्येय भाविकांनी या वेळी अनुभवला. या वेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्तांसह समस्त पुजारी,श्री खंडोबा पालखी सोहळा खांडेकरी  मानकरी ग्रामस्थ मंडळ ट्रस्टचे हजारो सेवेकरी,सहभागी झाले होते.

जेजुरी गडावरून मार्गस्थ झालेला पालखी सोहळा पायरी मार्गावरून बानुबाई मंदिर मार्गे, नंदी चौक मागनि पुढे जाऊन ऐतिहासिक मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिरात विसावला, त्यानंतर गावातून सोहळा मिरवत कन्हा नदीकडे मार्गस्थ झाला. वजनाने प्रचंड जड असलेली पालखी खांद्यावर घेऊन सुमारे पाच किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. सकाळी सात वाजता पालखी सोहळा कऱ्हा नदीवरील रंभाईशिंपीन कट्ट्यावर स्थिरावला. कऱ्हा नदीवर उत्सव मूर्ती समोर रुद्र आवर्तन व मंत्रघोष करण्यात आला.मानकरी व भाविकांनी उत्सवमूर्तीना विधिवत दही, दूध व कऱ्हास्नान घातले. या वेळी एक लाख भाविकांनी कऱ्हा स्नानाची पर्वणी लुटली. देव अंघोळीनंतर समाज आरती झाली. पालखी सोहळा परतीच्या मार्गावर घालेवाडी
दवणेमळा मार्गे जानाई मंदिरात पोहचला. जेजुरीचे ग्रामदैवत जानाई मंदिराचा विसावा झाल्यानंतर पालखी सोहळा सकाळी अकरा वाजता मानवी साखळी करीत गडावर दाखल झाला. रोजमुरावाटप (उत्सवमूर्तीचा स्पर्श करुन समृद्धीसाठी वाटप करण्यात आलेला प्रसाद) होऊन सोहळ्याची सांगता झाली.

सोमवती अमावास्येनिमित्त जेजुरी गडावरील श्री खंडोबा मंदिरासह परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती. या रंगबिरंगी रोषणाईच्या लखलखाटाने संपूर्ण गड परिसर उजळून निघाला होता. मुख्य खंडोबा मंदिर गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
जेजुरी गडापासून ते पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कऱ्हा नदीपर्यंत भाविकांची मोठी गर्दी पाहण्यास मिळाली.
श्री खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी,मानकरी,ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष ,पदाधिकारी,श्री.मार्तंड देवसंस्थान,जेजुरी पोलिस स्टेशन,जेजुरी नगरपरिषद व ग्रामस्थ यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे सोमवती पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Leave a Comment

You cannot copy content of this page