Resounding victory for the Mahayuti in the Legislative Council; secured 16 out of 17 seats, with rebel candidate Gokul Gite achieving a stunning victory in Nashik.

Photo of author

By Sandhya

महायुतीचा विधान परिषदेत दणदणीत विजय; १७ पैकी १६ जागांवर झेंडा, नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीते यांचा धक्कादायक विजय

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. १७ पैकी तब्बल १६ जागांवर महायुती समर्थित उमेदवार विजयी झाल्याने राज्याच्या राजकारणात महायुतीची ताकद अधिक भक्कम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळवण्यात अपयश आले असून अनेक ठिकाणी पिछेहाट झाली आहे.
१८ जून रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत १७ पैकी ६ जागांवर महायुतीचे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ११ जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपने सर्व ११ जागांवर विजय मिळवत शंभर टक्के यशाची नोंद केली. राष्ट्रवादी काँग्रेसने लढविलेल्या दोन्ही जागा जिंकल्या, तर शिवसेनेला चारपैकी तीन जागांवर समाधान मानावे लागले.
निकालानुसार भाजपचे ११, शिवसेनेचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. विशेष म्हणजे हा अपक्ष उमेदवार भाजपचा बंडखोर असल्याने नाशिकचा निकाल संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

नाशिकमध्ये महायुतीलाच महायुतीचा धक्का

या निवडणुकीतील सर्वात नाट्यमय आणि चक्रावून टाकणारा निकाल नाशिक मतदारसंघात लागला. महायुतीच्या वाटाघाटीत ही जागा शिवसेनेला मिळाल्यानंतर नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र भाजपचे नेते गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
गणेश गीते यांनी नंतर अर्ज मागे घेतला असला तरी गोकुळ गीते निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले. त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी अनेक फेऱ्यांच्या चर्चा केल्या. प्रचार थांबविल्याची घोषणा करूनही गोकुळ गीते यांनी पडद्यामागील रणनीती सुरू ठेवली आणि अखेर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत धक्कादायक विजय संपादन केला.
निकाल जाहीर होताच गोकुळ गीते समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला, तर नाशिकमधील हा निकाल महायुतीतील अंतर्गत राजकारणावर नव्याने चर्चा घडवून आणणारा ठरला.

विजयी उमेदवारांची यादी
ठाणे – रवींद्र फाटक (शिवसेना) – बिनविरोध
यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना) – बिनविरोध
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध
पुणे – विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध
वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर – अरुण लखाणी (भाजप) – बिनविरोध
अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे (भाजप) – बिनविरोध
छत्रपती संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाट (भाजप)
नाशिक – गोकुळ गीते (अपक्ष)
भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर (भाजप)
सांगली-सातारा – धैर्यशील कदम (भाजप)
परभणी-हिंगोली – सईद खान (शिवसेना)
सोलापूर – राजेंद्र राऊत (भाजप)
धाराशिव-लातूर-बीड – बसवराज पाटील (भाजप)
नागपूर – राजीव पोतदार (भाजप)
जळगाव – नंदकिशोर महाजन (भाजप)
अमरावती – प्रवीण पोटे (भाजप)
नांदेड – अमर राजूरकर (भाजप)

या निकालातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीची पकड कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे. भाजपने सर्वच्या सर्व ११ जागा जिंकत संघटनात्मक ताकद दाखवून दिली, तर शिवसेनेला नाशिकमधील पराभवाचा मोठा धक्का बसला. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा राजकारणाची दिशा काय असू शकते, याचीही चुणूक या निकालातून दिसून आली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page