Admit card chaos, security shambles! Pandemonium at the Vidhan Bhavan on the very first day of the monsoon session.

Photo of author

By Sandhya

प्रवेशपत्राचा घोळ, सुरक्षेचा बोजवारा! पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात गोंधळ

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशपत्र प्रक्रियेत अचानक करण्यात आलेल्या बदलामुळे सोमवारी विधानभवन परिसरात अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला. अधिवेशन सुरू होण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी जुनी प्रवेश व्यवस्था बंद करून नवीन डिजिटल फेस-स्कॅनिंग प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पत्रकार, शासकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या पुढाकाराने ही नवीन व्यवस्था लागू करण्यात आली. त्यानुसार सर्व संबंधितांना चेहरा पडताळणी (Face Verification) करूनच विधानभवनात प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले होते. यासाठी शनिवार आणि रविवारी सकाळी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत विधानभवनात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. ज्यांना प्रत्यक्ष येणे शक्य नव्हते, त्यांना फोटो व आवश्यक माहिती ई-मेलद्वारे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले होते.

संबंधितांचा डेटा पडताळून सर्वांना पुष्टीकरणाचा संदेश (Verification Message) पाठविण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येपर्यंत बहुतांश व्यक्तींना कोणताही संदेश प्राप्त झाला नाही. परिणामी सोमवारी सकाळी विधानभवनात प्रवेशासाठी मोठी गर्दी झाली आणि प्रवेशद्वारांवर झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या नव्या व्यवस्थेचा फटका आमदार भाई जगताप यांनाही बसला. त्यांनी पूर्वीच आपला फोटो सादर केला होता. मात्र प्रत्यक्ष प्रवेशावेळी फेस-रीडिंग प्रणालीने त्यांची ओळख पटवली नाही. चेहरा स्कॅन होत असूनही प्रवेशद्वार उघडत नसल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. एका विद्यमान आमदारालाच अशा अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर सामान्य पत्रकार, कर्मचारी आणि अभ्यागतांची अवस्था काय झाली असेल, असा प्रश्न उपस्थितांकडून विचारला जात होता.

अशा प्रकारच्या अनेक तक्रारी पत्रकार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडूनही करण्यात आल्या. विशेष म्हणजे, सुरक्षेच्या नावाखाली राबविण्यात आलेल्या या नव्या व्यवस्थेमुळेच प्रवेशद्वारांवर मोठी गर्दी निर्माण झाली. त्यामुळे सुरक्षेची हमी मिळण्याऐवजी सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी डिजिटल प्रवेश व्यवस्थेचा फज्जा उडाल्याने संबंधित प्रशासन आणि विधिमंडळ सचिवालयावर टीकेची झोड उठत आहे.

दरम्यान, दिवसअखेरही अनेकांचे व्हेरिफिकेशन आणि प्रवेश प्रक्रियेबाबत संभ्रम कायम असल्याने विधानभवन परिसरात गोंधळाचे वातावरण कायम होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page