
महायुतीचे विधानपरिषदेत वर्चस्व कायम; १६ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी, गोकुळ गीतेंची शिवसेनेत एन्ट्री
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये महायुतीने दणदणीत यश मिळवल्यानंतर विधानपरिषदेत सोमवारी नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात एकूण १६ सदस्यांनी आमदारपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झालेले गोकुळ गीते यांनी विजयानंतर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
२२ जून रोजी जाहीर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकालात महायुतीने १७ पैकी १६ जागांवर विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. १७ जागांपैकी ६ उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने १० जागांवर विजय मिळवला. नाशिकमध्ये मात्र महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
नाशिकमधील या निकालामुळे महायुतीतील काही घटक पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. मात्र निकाल लागल्यानंतर अवघ्या काही तासांतच गोकुळ गीते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडून आलेले गीते प्रत्यक्षात महायुतीच्या गोटात दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे विधानपरिषदेत महायुतीची ताकद आणखी वाढली आहे.
सोमवारी विधानपरिषद सभागृहात झालेल्या शपथविधी सोहळ्यात नव्या सदस्यांनी विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्याची शपथ घेतली. यामध्ये पुण्याचे विक्रम काकडे, रत्नागिरीचे अनिकेत तटकरे, साताऱ्याचे धैर्यशील कदम, सोलापूरचे राजेंद्र राऊत, नाशिकचे गोकुळ गीते यांच्यासह १६ सदस्यांचा समावेश होता.
या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांचे जावई अरुण लखाणी यांनीही विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे सभागृहात उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या शपथविधी सोहळ्याकडे राजकीय वर्तुळासह अनेकांचे लक्ष लागले होते.
गेल्या दोन महिन्यांत राज्यात विधानपरिषदेसाठी दोन टप्प्यांत निवडणुका पार पडल्या. पहिल्या टप्प्यातील १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामध्ये महायुतीचे ९ आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेचा १ उमेदवार विजयी झाला होता. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीतही महायुतीने जवळपास सर्व जागांवर विजय मिळवत आपले राजकीय वर्चस्व कायम राखले.
शपथविधीनंतर काही सदस्यांनी घोषणाबाजी करत आपली राजकीय भूमिका अधोरेखित केली. अमर राजूरकर यांनी “जय श्रीराम, जय भाजपा” अशी घोषणा दिली, तर बार्शीचे राजेंद्र राऊत यांनी “जय शिवराय”चा जयघोष करत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
शपथ घेतलेले सदस्य
विक्रम काकडे, अनिकेत तटकरे, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोतदार, बसवराज पाटील, अरुण लखाणी, अमर राजूरकर, अविनाश ब्राह्मणकर, दुष्यंत चतुर्वेदी, नंदकिशोर महाजन, प्रवीण पोटे, सुहास शिरसाठ, रवींद्र फाटक, राजेंद्र राऊत आणि प्राजक्त तनपुरे यांनी विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.
महायुतीच्या सलग विजयामुळे विधानपरिषदेत सत्ताधारी आघाडीची पकड आणखी मजबूत झाली असून आगामी काळातील विधिमंडळाच्या राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.