Public Works Minister Shivendrasinhraje Bhosale backs Chief Minister Devendra Fadnavis’s visionary leadership; approval granted for a ₹27,132-crore road improvement project.

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साथ; २७,१३२ कोटींच्या रस्ते सुधारणा प्रकल्पास मंजुरी

विकसित महाराष्ट्र २०४७च्या ध्येयपूर्तीसाठी २७,१३२ कोटींच्या रस्ते सुधारणा प्रकल्पाला मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला अभूतपूर्व गती देण्यात येत आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या महत्त्वाकांक्षी ध्येयपूर्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना २०२५-४७’ अंतर्गत राज्यातील २,८५७ किलोमीटर रस्त्यांच्या सुधारणेसाठी २७,१३२ कोटींच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

राज्याच्या औद्योगिक, कृषी, बंदर, खनिकर्म आणि पर्यटन क्षेत्रांना अधिक सक्षम जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी Growth Corridor आणि Tourism Corridor या संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

सध्या विविध योजनांद्वारे राज्यात सुमारे १९ हजार किलोमीटर रस्त्यांच्या सुधारणेची कामे प्रगतीपथावर आहेत. त्याचबरोबर ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी पहिल्या टप्प्यात ६ हजार किलोमीटर रस्त्यांचे उन्नतीकरण करण्यात येणार आहे.

या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी Asian Infrastructure Investment Bank (AIIB) आणि New Development Bank (NDB) यांच्याकडून १ अब्ज अमेरिकन डॉलरचे अर्थसहाय्यप्राप्त झाले असून, राज्याच्या पायाभूत सुविधा विकासाला जागतिक स्तरावरील वित्तीय पाठबळ मिळाले आहे.

ही योजना केवळ रस्ते विकासापुरती मर्यादित नसून पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचा आदर्श निर्माण करणारी आहे. रस्ते विकासासोबत वृक्षारोपण, जलपुनर्भरण, आधुनिक सुरक्षा उपाययोजना आणि सामाजिक सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे.

याबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील रस्ते विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. या योजनेमुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल, गुंतवणुकीला चालना मिळेल आणि महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक व औद्योगिक प्रगतीला नवी दिशा प्राप्त होईल.”

‘महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना २०२५-४७’ अंतर्गत मंजूर करण्यात आलेला हा प्रकल्प विकसित महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक आणि दूरगामी पाऊल ठरणार आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page