MP Dr. Jyoti Waghmare lashes out at Sanjay Raut over his reckless statements; Sanjay Raut himself is the mastermind behind ‘Operation Sink Ubatha’!!

Photo of author

By Sandhya

“संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्यांवर खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा घणाघात; “ऑपरेशन उबाठा बुडवा”चे सूत्रधार स्वतः संजय राऊतच..!!”

पुणे, दि. २७ जून : शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या व खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी आज पुण्यातील सारसबागेसमोरील शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या सातत्याने सुरू असलेल्या बेताल, अश्लाघ्य आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे प्रमुख उपस्थित होते. संजय राऊत यांच्या वक्तृत्वामुळेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वैचारिक दिवाळखोरी संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघडी पडली असून, पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना दूर लोटण्यामागे सर्वात मोठे कारण त्यांच्या विषारी आणि अहंकारी भाषेचे राजकारण असल्याचा घणाघात खासदार वाघमारे यांनी केला.

खासदार डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या की, ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्ते कथित “खोक्यांमुळे” पक्ष सोडून गेले नसून, पक्षातील असुरक्षित वातावरण, नेतृत्वाचा अभाव आणि संजय राऊत यांच्यासारख्या व्यक्तींच्या सततच्या अपमानास्पद वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या “धोक्यामुळे” त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. आज महाराष्ट्रात सुरू असलेले “ऑपरेशन उबाठा बुडवा” हे विरोधकांनी नव्हे, तर स्वतः संजय राऊत यांनीच त्यांच्या बेताल वक्तव्यांद्वारे सुरू केले असून, प्रत्येक पत्रकार परिषदेत ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची प्रतिमा अधिकाधिक खालावत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

त्या पुढे म्हणाल्या की, संजय राऊत आता ठाकरे गटाचे प्रवक्ते राहिलेले नसून, काँग्रेसची राजकीय सुपारी घेऊन शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करणारे “सुपारीबाज प्रवक्ते” बनले आहेत. महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा करण्याऐवजी वैयक्तिक टीका, महिलांबद्दल अवमानकारक भाषा आणि विरोधकांबद्दल अपशब्द वापरणे हीच त्यांची राजकीय ओळख बनली आहे. अशा भाषेमुळे समाजात चुकीचा संदेश जात असून, लोकशाहीतील राजकीय संस्कृतीच कलंकित होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासकामांमुळे विरोधक पूर्णपणे अस्वस्थ झाले आहेत. राज्यभर विकासाचे नवे विक्रम घडत असताना त्याला उत्तर देता येत नसल्यामुळेच संजय राऊत यांच्याकडून अशा प्रकारची निराधार आणि बेताल विधाने केली जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सुरू असलेल्या दौऱ्यांवर टीका करताना वाघमारे म्हणाल्या की, जनतेने नाकारलेल्या नेतृत्वाकडून जनतेला मार्गदर्शन मिळू शकत नाही. स्वतःच्या पक्षातून निघून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन भाषणे करणे हा केवळ राजकीय दिखावा असून, त्यातून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत, महिलांच्या सन्मानाच्या रक्षणासाठीच ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे खासदार वाघमारे यांनी स्पष्ट केले. महिलांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती देत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना थेट प्रश्न केला की, संजय राऊत यांच्या महिलांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याला त्यांचा पाठिंबा आहे का? महाराष्ट्रातील महिला भगिनी या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे मागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, एका बाजूला महिलांच्या सन्मानाबाबत बोलण्याचा आव आणायचा आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या पक्षाच्या प्रवक्त्याकडून सातत्याने महिलांचा अपमान होत असतानाही मौन बाळगायचे, हा ठाकरे गटाचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप त्यांनी केला. राजकारणात मतभेद असू शकतात; परंतु वैचारिक पातळी सोडून वैयक्तिक आणि अश्लाघ्य भाषेचा वापर करणाऱ्यांना महाराष्ट्रातील सुजाण जनता कधीही माफ करणार नाही, असा इशाराही खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिला.

Leave a Comment

You cannot copy content of this page