



चेंबूर बस दुर्घटना: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी घेतली घटनास्थळी धाव; दुःखी कुटुंबीयांचे केले सांत्वन
चेंबूर येथील ११ व्या रोडवर आज दुपारी २:५० च्या सुमारास युनिव्हर्सल प्रायव्हेट स्कूल, टिळकनगर यांच्या बसवर झाड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या गंभीर अपघाताची माहिती मिळताच शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत विद्यार्थी विहांग श्रीवास्तव याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, मंत्री भुसे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत शोककुल पालकांचे सांत्वन केले.
मंत्री महोदयांनी दुर्घटनाग्रस्त बसची आणि परिसराची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मंत्री श्री भुसे यांनी चेंबूर येथील जैन हॉस्पिटलला भेट दिली, जिथे या अपघातातील जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. त्यांनी यावेळी जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली,कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि डॉक्टरांना त्यांच्या उपचारांत कोणतीही कसूर न ठेवता सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरवण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, एम पश्चिम महानगरपालिकेचे सहायक आयुक्त शंकर भोसले, पोलीस प्रशासन, शिक्षण विभागातील अधिकारी यांच्याकडून मंत्री महोदयांनी अपघाताबाबत माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल आणि उचित कार्यवाही करून प्रशासनास योग्य निर्देश दिले जातील, असे आश्वासन मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले.