
खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देणारास अटक
सिक्युरिटी व्यवसाय बंद करण्याची व जीवे ठार मारण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या रेकॉर्डवरील खंडणी बहाददराला खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून एकूण ११ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत शामराव बाबर (वय - ४४, रा. समर्थनगर, नवी सांगवी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. बाबर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खंडणी विरोधी पथकाने महेश सखाराम शिरोळे यास खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश शिरोळे याने मागील महिन्यातील (दि.२५ ते २९) जून दरम्यान फिर्यादी श्रीकांत बाबर यांना स्वतःच्या मोबाईलवरून वारंवार संपर्क साधून सिक्युरिटीचा व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर सुरुवातीला १० लाख, त्यानंतर ८ लाख, ७ लाख आणि शेवटी ६ लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा व्यवसाय बंद पाडू असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.
चाकणमध्ये माझी मोठी दहशत आहे, पैसे दिले नाहीत तर खल्लास करून टाकीन," अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने सापळा रचला. ठरल्या प्रमाणे तक्रारदाराच्या कंपनीतील सुपरवायझर संदीप कणसे यांच्या माध्यमातून ३ लाख रुपयांचे बनावट बंडल तयार करण्यात आले. त्यामध्ये काही खऱ्या नोटा व उर्वरित डमी नोटांचा समावेश करून आरोपीला देण्यात आल्या. मंगळवारी (दि.३० जून ) सायंकाळी सुमारे ६ वाजता आळंदी - पुणे रस्त्यावरील मॅक्झिन चौकाजवळील स्वच्छतागृह परिसरात आरोपी मसना ऊर्फ महेश सखाराम शिरोळे (वय २८, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) हा ३ लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले.
कारवाई दरम्यान आरोपीकडून एकूण ११ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाने केली.