‘Do not accord respect to traitors; it damages credibility’: Raut lashes out over Shinde-Pawar meeting.

Photo of author

By Sandhya

‘गद्दारांना प्रतिष्ठा देऊ नका; विश्वासार्हतेला तडा जातो’ : शिंदे-पवारांच्या बैठकीवर राऊतांचा घणाघात

विधानभवनातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची बैठक घेतल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “गद्दारांना प्रतिष्ठा देऊ नका; अशा कृतीमुळे पक्षाच्या विश्वासार्हतेला तडा जातो,” असा घणाघात केला.

गुरुवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार हे देशातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्री किंवा अन्य नेत्यांना भेटण्यात काहीही गैर नाही. मात्र, ज्या एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करून सरकार पाडले, त्यांच्या दालनात जाऊन पक्षाची बैठक घेणे योग्य नाही. अशा कृतीमुळे चुकीचा राजकीय संदेश जातो आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची विश्वासार्हता कमी होते, असे त्यांनी म्हटले.

राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले, “अख्खे विधानभवन रिकामे होते का? समोर राष्ट्रवादी भवन, शिवसेना भवन आणि इतर बैठकीसाठी अनेक जागा उपलब्ध असताना शिंदे यांच्या दालनातच बैठक घेण्याची गरज काय होती? यामुळे महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.”

ते पुढे म्हणाले, “जर आम्ही अजित पवार यांच्या दालनात जाऊन बैठक घेतली असती, तर आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात गेलो, असा अर्थ काढला गेला असता. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी काही राजकीय संकेत आणि मर्यादा पाळल्या पाहिजेत.”

‘आमच्यासारख्या निष्ठावंतांना हे मान्य नाही’

राऊत म्हणाले, “हे फक्त माझे मत नाही, तर शिवसेनेतील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. आम्ही इतकेही सहिष्णु नाही. ज्यांचे मन मोठे आहे त्यांनी तसे करावे; पण अशा कृतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची विश्वासार्हता कमी होते.”

सीमाप्रश्नाच्या बैठकीवरही उपस्थित केले सवाल

शरद पवार हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील बैठकीसाठी विधानभवनात आले होते. याच संदर्भात राऊत यांनी सरकारवर टीका करत विचारले, “या बैठकीत नेमके काय झाले, हे जनतेसमोर का आले नाही? शिवसेना हा सीमाप्रश्नातील महत्त्वाचा पक्षकार असताना आम्हाला का बोलावले नाही? सर्वोच्च न्यायालयात सरकारचे वकील अनेकदा अनुपस्थित का राहतात? सीमाभागातील मराठी बांधवांच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने पाहत आहे का?”

‘शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत; पण…’

राऊत यांनी स्पष्ट केले की, शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत, याबाबत त्यांना शंका नाही. “त्यांच्या विचारधारेवर माझा विश्वास आहे. मात्र, त्यांच्या कालच्या कृतीमुळे शिवसेना अस्वस्थ झाली आहे. या बैठकीची गरज नव्हती. तुम्ही महाराष्ट्राला काय संदेश देत आहात? ज्यांना तुम्ही गद्दार म्हणता, त्यांनाच प्रतिष्ठा देत असाल, तर मग गद्दारीविरोधात लढण्याचा नैतिक अधिकार उरत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

‘ही गोष्ट आमच्या मनाला लागली’

राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे हे यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक किंवा विलासराव देशमुख यांच्यासारखे नेते नाहीत की त्यांच्या दालनात जाऊन बैठक घ्यावी. ही गोष्ट आमच्या मनाला लागली आहे.”

शिंदे यांच्या दालनात झालेल्या शरद पवारांच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीतील समन्वय आणि राजकीय संदेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page