स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेत १५ दिवसीय विशेष स्वच्छता अभियान; महापौर मा. मंजुषा ताई नागपुरे यांचा पुढाकार

Photo of author

By Sandhya


स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरभर १५ दिवसीय विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानाचे प्रभावी नियोजन करण्यासाठी आज महापौर मा. मंजुषा ताई नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीस उपमहापौर मा. परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष मा. श्रीनाथ भिमाले, गटनेते मा. गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते मा. निलेश निकम, माजी महापौर, नगरसेवक, महापालिका आयुक्त मा. नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त मा. प्रजीत नायर, उपआयुक्त तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत महापौर मा. मंजुषा ताई नागपुरे यांनी सांगितले की, “स्व. अजितदादा पवार यांनी सार्वजनिक स्वच्छतेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पुणे शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविणे होय. ही मोहीम केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक पुणेकराची आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास स्वच्छतेचे हे लोकआंदोलन अधिक प्रभावी ठरेल.”

महापौरांनी प्रशासनाला शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत २२ जुलै २०२६ पासून १५ दिवसांचे विशेष स्वच्छता अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहभागातून दैनंदिन नियोजन करण्यात यावे. सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख रस्ते, पदपथ, चौक तसेच क्रॉनिक स्पॉटची विशेष स्वच्छता करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

याशिवाय स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, नागरिक, युवक मंडळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून ही मोहीम लोकचळवळीच्या स्वरूपात राबविण्यात यावी, तसेच घरातील टाकाऊ व खराब वस्तू संकलनासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात यावी, अशाही सूचना देण्यात आल्या.

स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पारितोषिक योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रथम क्रमांकाच्या क्षेत्रीय कार्यालयास ₹५० लाख, द्वितीय क्रमांकाच्या क्षेत्रीय कार्यालयास ₹२५ लाख, तर तृतीय क्रमांकाच्या क्षेत्रीय कार्यालयास ₹१५ लाखांचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वच्छतेबाबत निरोगी व सकारात्मक स्पर्धा निर्माण होईल, कामकाजाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईल आणि नागरिकांना अधिक स्वच्छ, सुंदर व दर्जेदार नागरी सेवा उपलब्ध होतील. या माध्यमातून “स्वच्छ पुणे, सुंदर पुणे” हे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य होईल, असा विश्वास महापौर मा. मंजुषा ताई नागपुरे यांनी व्यक्त केला.

महापौरांनी अभियानाचा व्यापक प्रचार रेडिओ संदेश, होर्डिंग्ज, फलक व जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात यावा. त्यामध्ये “पुणे प्रथम” हा लोगो वापरण्यात यावा , तसेच स्वच्छता कामगारांसाठी आवश्यक सुरक्षासाहित्य, हातमोजे, फवारणी यंत्रे व इतर साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

यावेळी महापौरांनी स्पष्ट केले की, या अभियानासाठी आवश्यक निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने लोकसहभागातून ही मोहीम यशस्वी करावी आणि स्वच्छ, सुंदर व निरोगी पुणे घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने महापौर मा. मंजुषा ताई नागपुरे यांनी सर्व पुणेकरांना या विशेष स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून स्वच्छ, सुंदर, हरित आणि निरोगी पुणे घडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page