मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यालासन्मानपूर्वक आणि सुखकर यात्रा देण्याचा शासनाचा संकल्पबोधगया येथे महाराष्ट्राच्या यात्रेकरूंना मिळणार कायमस्वरूपी निवास सुविधा-सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट· दादरहून बोधगयाकडे विशेष तीर्थदर्शन रेल्वे रवाना

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही केवळ तीर्थयात्रा नसून ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण करणारी योजना आहे. प्रत्येक लाभार्थ्याला सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बोधगया येथे दर्शनासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील यात्रेकरूंना भविष्यात कायमस्वरूपी आणि दर्जेदार निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, त्यासाठी तेथे १० एकर जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया येथे जाणाऱ्या विशेष तीर्थदर्शन रेल्वेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. मंत्री संजय शिरसाट व मान्यवरांच्या हस्ते बोधगया येथे भाविकांना घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला दादर रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार मनीषा कायंदे, आमदार तुकाराम काते, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, तसेच समाजकल्याण विभागाचे मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले, बोधगयाला दरवर्षी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील भाविक आणि यात्रेकरू भेट देतात. त्यांना निवासासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी तेथे कायमस्वरूपी सुविधा उभारण्याचा शासनाचा मानस आहे. बोधगया येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंसाठी कायमस्वरूपी निवासाची सुविधा उभारण्याच्या दृष्टीने जागा उपलब्ध करून घेण्याबाबत शासन सकारात्मक पावले उचलत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे आयुष्यात कधीच बोधगयाला जाण्याची संधी मिळाली नव्हती. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत असून, ही बाब शासनासाठीही समाधानाची आहे. यात्रेदरम्यान सर्वांनी परस्पर सहकार्य, बंधुभाव आणि शिस्त राखावी, गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करावे आणि ही सहा दिवसांची यात्रा आनंदाने व चिंतामुक्त वातावरणात अनुभवावी. या यात्रेदरम्यान प्रत्येक लाभार्थ्यास आरक्षित आसन, दर्जेदार भोजन, नाश्ता, वैद्यकीय सुविधा, निवास व्यवस्था तसेच अधिकाऱ्यांचे सतत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात्रेदरम्यान कोणालाही कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून आवश्यक असल्यास लाभार्थ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार मनीषा कायंदे, आमदार तुकाराम काते, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
राज्यातील नागरिकांना देशातील ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांचे दर्शन घडवून आणणे, तसेच समाजातील विविध घटकांना अध्यात्म, सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय एकात्मतेची अनुभूती देणे, हा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या विशेष तीर्थयात्रेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील ८०० पात्र लाभार्थी सहभागी झाले आहेत. २० जुलै ते २६ जुलै २०२६ या कालावधीत या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष रेल्वे प्रवासादरम्यान लाभार्थ्यांना प्रवास, नाश्ता, भोजन, निवास, वैद्यकीय सुविधा तसेच इतर आवश्यक सोयी-सुविधा शासनामार्फत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी केले तर आभार सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी मानले.

Leave a Comment

You cannot copy content of this page