
पुणे, दि. ३० : भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, राज्यातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुनरिक्षणाच्या कामावर झालेल्या परिणामाची दखल घेत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोकण, मुंबई तसेच राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे विशेष सखोल पुनरिक्षणाच्या कामकाजावर परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमातील मुदत वाढविण्याची विनंती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत भारत निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडून गृहभेटींचा कालावधी ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ असा राहणार आहे. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचनेचे कामही ८ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मतदार याद्यांचा प्रारूप मसुदा १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून, त्यावरील सुनावणी व निकाली काढण्याची प्रक्रिया १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पूर्ण केली जाईल. अंतिम मतदार यादी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदार याद्यांमधील काही मतदारांच्या पत्त्यांची माहिती अपुरी किंवा संक्षिप्त स्वरूपात नोंदविण्यात आलेली होती.उदाहरणार्थ, एखाद्या मतदाराचा पत्ता केवळ “अमुक व्यक्ती, कोथरूड, पुणे” एवढाच नमूद असल्यास संबंधित मतदाराचा शोध घेणे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठी (BLO) वेळखाऊ आणि आव्हानात्मक ठरते. त्यामुळे अशा मतदारांनी स्वतःहून आपल्या क्षेत्रातील BLO यांच्याशी संपर्क साधल्यास नोंदणी अर्ज (Enumeration Form) वाटप व पडताळणीची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
नागरिकांना त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे (BLO) नाव व संपर्क क्रमांक जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीचा उपयोग करता येईल. संबंधित माहिती pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी नमूद केले आहे.