एका आरोपीला हरियाणा येथे घेऊन जाणाऱ्या हरियाणा पोलिसांचे वाहन वर्ध्यानजीक समृद्धी महामार्गावर ट्रकला धडकले. वर्धा येथील येळाकेळी टोल प्लाझा नजीक घडलेल्या या घटनेत हरियाणाच्या पंचकुला पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला. या अपघातात चालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
परभणी येथून आरोपीला घेऊन हरियाणा पोलीस नागपूरमार्गे समृद्धी महामार्गाने जात होते. दरम्यान वर्ध्याच्या येळाकेळी येथील पांढरकवडा शिवारात हरियाणा पोलिसांचे वाहन समोर असलेल्या ट्रकला उजव्या बाजूने धडकले.
या वाहनात ५ जण होते. महिला पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा या अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वाहन चालक शमी कुमार, सविदर सिंग, वैदनाथ शिंदे, बिटू जागडा जखमी झाले आहेत. जखमींना वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.