महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकालात कोर्टाने महत्त्वपूर्ण विषयांवर काल निरीक्षण केले आहे. यावरूनआता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. राज्यातील सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे, या सरकारचा मृत्यू अटळ आहे. हे सरकार येत्या तीन महिन्यात जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “अधिकाऱ्यांनी आणि प्रशासन पोलिसांनी या सरकारचे आदेश पाळू नयेत. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे. नाहीतर तुम्ही अडचणीत येताल. आमचे व्हीप कायदेशीर असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राजकीय पक्ष हा विधीमंडळ पक्ष तयार करतो. फुटलेला गट मूळ पक्षावर दावा करु शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण सरकार बेकायदेशीर ठरवले असल्याने आम्ही त्यांचे आभार मानतो.”
हे सरकार तीन महिन्यात जाणार आहे. या सरकारचा मृत्यू अटळ आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर आहे. विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निवाड्यानुसारचं न्याय करावा लागणार आहे. आम्ही सत्तेसाठी भुकेलो नाही. उद्धव ठाकरेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे.
उद्धव ठाकरेंचे काहीही चुकले नसल्याचे संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे. “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनेक पक्ष बदललेले आहेत. ते आधी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये होते, आता भाजपमध्ये आहेत. पुढे ते कुठं असतील ते मला माहित नाही. त्यांना कोणतही राजकीय स्थैर्य नाही, त्यांना केवळ सत्ता हा आधार आहे.”