गरिबांचा फ्रिज म्हणून प्रसिद्ध असलेल्या माठांच्या मागणीत वाढ

Photo of author

By Sandhya

गरिबांचा फ्रिज

खटाव तालुक्‍यात मागील दोन दिवसांपासून उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने बाहेर पडताच अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. यामुळे पाण्यासाठी गरिबांचा फ्रिज म्हणून प्रसिद्ध असलेल्या माठांना मागणी वाढली आहे. परंतु यंदा माठांच्या बाजारातही तेजीत असल्याचे चित्र आहे. खटाव तालुक्‍यासह ग्रामीण भागात वाढत्या उन्हामुळे उकाडाही वाढत आहे.

परिसरात दुपारी पारा वाढत जात आहे. वाढत्या तापमानाने थंड पेयांना मागणी वाढली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने आठवडे बाजारात स्थानिक कारागिरांनी मातीचे माठ विक्रीस आणले आहेत. मागील वर्षी दीडशे ते दोनशे रुपये किंमत असलेल्या माठांना यंदा अडीचशे ते चारशे रुपये किंमत झाली आहे. वाढती महागाई, मजुरी, वाहतूक याच्या परिणामी किमती वाढल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.

किंमत जास्त असली तरी फ्रिज मधील थंड पाण्यापेक्षा माठातील पाण्यालाच गोडी अधिक असल्याने गरीबांसह श्रीमंतही माठाची हौसेने खरेदी करताना दिसत आहेत. कारागिरांनीही माठामध्ये कालानुरुप थोडासा बदल करुन या माठांना तोटया बसून त्याची विक्री सुरू केली आहे. सध्याच्या काळात थंडगार बाटलीबंद पाणी सर्वत्र उपलब्ध होत आहे.

तर थंड पाण्याचे जार घरोघरी जाऊ लागले आहेत. यासह थोडासा बदल करून लहान मोठे व्यावसायिक, बॅंका, निमशासकीय कार्यालये, सेवा सोसायटी, हॉस्पिटल, अशा ठिकाणी, थंड पाण्याचे जार ठेवले जात आहे. परिसरातील हॉटेलांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी थंड जार पाणी उपलब्ध करण्याची स्पर्धा लागलेली असलेली आहे. याचा परिणाम माठ विक्रीवर होत असल्याचे विक्रेते सांगत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page