कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने एकतर्फी बाजी मारली

Photo of author

By Sandhya

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने एकतर्फी बाजी मारली

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अत्यंत महत्वाच्या गणल्या गेलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने एकतर्फी बाजी मारली आहे. 224 पैकी बहुमतासाठी 113 आकडा आवश्‍यक असताना कॉंग्रेसने 137 जागा मिळवल्या तर भाजपला केवळ 64 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

जेडीएसला आत्तापर्यंतच्या सर्वात कमी म्हणजे एकूण 20 जागा मिळाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा या ज्येष्ठ नेत्यांसह भाजपने आपली सारी ताकत कर्नाटकात लावली होती.

पंतप्रधानांच्या व्यापक सभा आणि रोड शोंनी कर्नाटकाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अगदी शेवटच्या टप्प्यात कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात बजरंग दलासारख्या विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांवर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते.

तोच मुद्दा उचलून कॉंग्रेसने बजरंगबलीचा अपमान केल्याचा डांगोरा भाजपकडून पिटण्यात आला. त्यातून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचाही प्रयत्न झाला. परंतु कर्नाटकच्या जनतेना हा प्रयत्न साफ नाकारला आहे.

या निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या चाळीस टक्के कमीशन सरकारचा मुद्दा बराच गाजला. त्याचा भाजपला मोठा फटका बसला आहे. कर्नाटकातील या विजयाकडे कॉंग्रेसच्या राजकारणातील कमबॅकच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे.

Leave a Comment