पुणे : आंबील ओढ्यासह नाल्यांची शनिवारी पाहणी ; साफसफाईचे काम पूर्ण करण्याचे आदेश

Photo of author

By Sandhya

आंबील ओढ्यासह नाल्यांची शनिवारी पाहणी

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील आंबील ओढ्यासह नाल्यांची शनिवारी पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी परिसरातील ओढे, नाल्यांच्या साफसफाईचे काम पूर्ण करण्याचे आदेश या वेळी आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

पावसाळ्यात आंबील ओढ्याला पूर येतो. या पार्श्वभूमीवर या ओढ्याला मिळणार्‍या नाल्यांच्या साफसफाईचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. ठेकेदाराकडून हे काम व्यवस्थित होत आहे की नाही, तसेच त्यातील अडथळे आदींची आयुक्तांनी पाहणी केली. के. के. मार्केट, संगम सोसायटीच्या पाठीमागील परिसर, पद्मावती मुख्य पूल, गंगाधाम चौक, महर्षीनगर, मुकुंदनगर आदी भागातील ओढे व नाल्यांची आयुक्तांनी पाहणी केली.

जून महिन्यापूर्वी परिसरातील ओढे व नाल्यांच्या साफसफाईचे काम पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकार्‍यांना या वेळी दिले. अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, उपायुक्त अविनाश सपकाळ, बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रकाश पवार, अधीक्षक अभियंता संतोष तांदळे, देवेंद्र पात्रे, ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील अहिरे, उपाभियंता राजेश फटाले, कनिष्ठ अभियंता सोपान रुपनर, शुभम बाबर, संपदा काळे, आरोग्य निरीक्षक श्रीधर कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Comment