काँग्रेसमधून निलंबित झालेले आशिष देशमुख यांनी गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात आशिष देशमुख भाजपमध्ये जाणार अशा चर्चाही रंगल्या होत्या.
दरम्यान, आता आशिष देशमुख यांनी खळबळजनक असं विधान केलं आहे. उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे एकत्र येतील आणि महाविकास आघाडी तुटेल असं वक्तव्य त्यांनी केलंय.
आशिष देशमुख म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येऊन महाविकास आघाडी तुटेल. दोन्ही गट एकत्र आल्यानंतर भाजपला पाठिंबा देणार असल्याचा दावाही आशिष देशमुख यांनी केला.
सध्याच्या परिस्थितीत ठाकरे गटाचे खासदार, आमदार निलंबीत होऊ नयेत म्हणून ठाकरे गट शिंदे गटासोबत जाईल. ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदार, खासदारांना आपलं राजकीय भवितव्य डावावर लावायचं नाही असंही आशिष देशमुख म्हणाले.
काही दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्या भेटीला काही दिवस होताच आशिष देशमुख यांनी केलेल्या या वक्तव्यांमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.