साईंच्या शिर्डीत गुन्हेगारीने पुन्हा डोकेवर काढले

Photo of author

By Sandhya

शिर्डी

साईंच्या शिर्डीत गुन्हेगारीने पुन्हा डोकेवर काढले असून पॉलिशवाले एजंटांनी चक्क खंडोबा मंदिर व गेट न. 3 च्या ठिकाणी भाविकांना व ग्रामस्थांना दमबाजी करीत मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

साईसमाधी मंदिरात हार, फुल, प्रसाद व पूजेचे साहित्य नेण्यास बंदी असूनही अनेक एजंट व पॉलिशवाले भाविकांना खोटं सांगून नको त्या वस्तू पूजेच्या नावाखाली विकत घेण्यास भाग पाडत असून यात दररोज अनेक भाविकांची लूटमार सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे याकडे शिर्डी ग्रामस्थांनी लक्ष वेधले होते.

मंत्री विखे पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस व महसूल प्रशासन व शिर्डी ग्रामस्थांच्या समवेत बैठक घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

सुरुवातीला पोलिसांनी मंत्री विखे पाटील व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा दाखविला, मात्र खास करून या कारवाईसाठी जे पोलीस पथक स्थापन केले होते.

त्याच पथकातील काही पोलिसांनी हारप्रसाद दुकानदार मालक, एजंट व पॉलिशवाले यांच्याशी आर्थिक हितसंबंध स्थापन करून पालकमंत्री व पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला हडताळ फासला आहे.

शिर्डीत भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक एजंट व पॉलिशवाल्यांच्या टोळ्या खंडोबा मंदिर, कानिफनाथ मंदिर, साई कॉम्प्लेक्‍स ताजीमखानबाबा चौक, गेट नं. 1, 2 व 3 या ठिकाणी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत अनेक भाविकांना सावज बनवून पूजा साहित्य, हार प्रसाद, झटपट दर्शन, पार्किंग या नावाखाली खोटं सांगून फसवणूक करत असून याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

नगर मनमाड रस्त्यावर उभे राहून भाविकांच्या गाड्या थांबवून वाहन तळाची सोय करण्याच्या नावाखाली तर कधी भाविकांच्या गाड्यांचा पाठलाग करून अनेक लूटींच्या घटनेत वाढ झाली आहे. खंडोबा मंदिरासमोर गेट नं. 3 वर झालेल्या मारहाणीच्या प्रकारामुळे सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थ पुन्हा एकवटले असून जर या घटना पंधरा दिवसाच्या आत थांबल्या नाहीत आणि एजंट व पॉलिशवाले यांचा कायमचाच बंदोबस्त शिर्डी पोलीस स्टेशनने केला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Leave a Comment