राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आणि मुंबई एपीएमसी संचालक, माथाडी कामगार संघटनेचे नेते शशिकांत शिंदे यांचे बंधु ऋषीकांत शिंदे यांनी काल (शनिवार) रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबई शिवसेना शहर प्रमुख किशोर पाटकर, उपनेते विजय नाहटा यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.
माथाडी कामगार संघटनेत संयुक्त सरचिटणीस पदावर ऋषीकांत शिंदे कार्यरत आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे लहान बंधु आहेत.
गेल्या पाच महिन्यापूर्वी घणसोलीत सम्पेक्स गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकीत माथाडी नेते व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील व आमदार गणेश नाईक पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडवत त्रषीकांत शिंदे यांनी एक हाती सत्ता काबीज केली होती.
यामागे ही मोठी राजकीय खेळी होती. सिडकोने माथाडी कामगारांसाठी अल्प उत्पन्न गटात सिम्पेल्कस महागृहनिर्माण योजना राबवली होती. त्या ठिकाणी तीन हजार माथाडी कामगारांना 33 इमारती 3300 घरे देण्यात आली होती. हे संकुल 22 एकर जागेवर उभारण्यात आले आहे.
याच इमारतींच्या पुर्नविकासाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सर्व पुर्नविकासाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, या पुर्नविकासाची फाईल नगरविकास विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पोहचली आहे. त्यामुळे एका दगडात दोन कामे उरकण्याचा शिंदे-शिंदे गटाचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हा प्रकल्प हाती घेण्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या मार्गाने पर्याय शोधले होते. मात्र सोसायट्यांच्या निवडणुकीत झालेला दारुण पराभवानतंर आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधु त्रषीकांत शिंदे यांनी या प्रकल्पाचे सुत्र हाती घेतले. ऋषीकांत शिंदे याच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशामुळे माथाडी संघटनेत खळबळ उडाली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माथाडी संघटनेत एकप्रकारे प्रवेश केला आहे.