पुणेकरांची इथेपण आघाडी ; वीजबिल ऑनलाइन भरण्यात पुणेकर अव्वल

Photo of author

By Sandhya

पुणे

महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये राज्यात आघाडी कायम ठेवली आहे. गेल्या मे महिन्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिकसह इतर 20 लाख 15 हजार लघुदाब वीजग्राहकांनी रांगेत उभे न राहता व सुरक्षितपणे 564 कोटी 99 लाख रुपयांचा ‘ऑनलाइन’द्वारे भरणा केला.

पुणे परिमंडलामध्ये गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत लघुदाब वर्गवारीतील सरासरी 17 लाख 41 हजार 860 वीजग्राहक दरमहा ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा करीत होते.

ही संख्या ऑक्टोबर ते डिसेंबर 2022पर्यंत 18 लाख 64 हजार 820 वर गेली. त्यानंतर जानेवारी ते मे 2023 पर्यंत सरासरी दरमहा ग्राहकांची संख्या 20 लाख 21 हजार 130 वर गेली आहे.

‘ऑनलाइन’ बिल भरण्यास पुणे परिमंडलामध्ये वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि दरमहा सरासरी 1 लाख 56 हजार 330 वीजग्राहकांची गेल्या 5 महिन्यांमध्ये वाढ झाली आहे.

गेल्या मे महिन्यात पुणे शहरातील 11 लाख 30 हजार 225 लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी 312 कोटी 87 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे.

यामध्ये महावितरणच्या बंडगार्डन विभागातील सर्वाधिक 1 लाख 91 हजार 913 ग्राहकांचा समावेश आहे. उर्वरित शिवाजीनगर, कोथरूड, नगर रोड, पद्मावती, पर्वती व रास्ता पेठ विभागांमध्ये सरासरी 1 लाख 56 हजार 385 वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास पसंती दिली आहे.

Leave a Comment