म्हसरूळ येथील ठक्कर मैदानावर आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या पुढाकारातून मंगळवारी (दि. ६) बैलगाडा शर्यत होणार आहे. यात राज्यभरातील ४०० हून अधिक बैलगाडा स्पर्धक भाग घेणार असून, हा थरार बघण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे.
सर्वाेच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविली आहे. भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी कायदेशीर लढाई लढली होती. या पार्श्वभूमीवर आ. ढिकले व म्हसरूळ ग्रामस्थांच्या पुढाकारातून तब्बल ११ वर्षांनंतर बैलगाडा शर्यत होणार आहे.
शर्यतीसाठी खास धावणारे खिल्लार, म्हैसूर गावरान, निळा काेसा, कर्नाटकी खिल्लार, गावरान खिल्लार या प्रजातींचे बैल या शर्यतीत सहभागी हाेणार आहेत.
जिल्ह्यासह सातारा, सांगली, पुणे, जळगाव यांसह राज्यातील विविध भागांतून तब्बल ४०० हून अधिक बैलगाडे या शर्यतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आयोजकांनी वर्तविली आहे.