PUNE : आषाढी बंदोबस्तासाठी तब्बल 7 हजार पोलिस तैनात

Photo of author

By Sandhya

आषाढी वारीतील बंदोबस्तासाठी तब्बल 7 हजार पोलिस तैनात

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्ताची आखणी केली असून, तब्बल सात हजारांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहेत.

ड्रोनद्वारे पालखीवर नजर राहणार असून, दिंड्या व पोलिसांच्या समन्वयासाठी दहा दिंड्यांसोबत एक वॉकीटॉकी घेतलेला कर्मचारी तैनात असणार आहे.

दरम्यान, यंदा होणारी विक्रमी गर्दी विचारात घेता पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताचे कडेकोट नियोजन केले आहे.

10 जून रोजी देहू येथून श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज व 11 जून रोजी आळंदी येथून श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.

दोन्ही पालख्यांचे 12 तारखेला पुण्यात आगमन होणार असून, 12 व 13 जून रोजी पुण्यात मुक्कामी असणार आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यापासून वाहतुकीचे नियोजन करण्यापर्यंतची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागते.

पाटील इस्टेट येथे 12 तारखेला दोन्ही पालख्यांचे आगमन होणार आहे. दोन्ही पालख्या 14 तारखेला सकाळी सहा वाजता शहरातून बाहेर प्रस्थान करणार आहेत.

आगमनापासून ते शहराबाहेर पालखी मार्गस्थ होईपर्यंत पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आहे. यासाठी वाहतूक पोलिसांचादेखील स्वतंत्र बंदोबस्त असणार असून, नागरिकांना अडचण होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. पालखीवर ड्रोनद्वारे वॉच पालखीचे शहरात आगमन झाल्यापासून पालखीवर  ड्रोनची नजर असणार आहे. 

त्यामुळे पोलिसांना मोठी मदत होणार असून, ड्रोनशिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. परिणामी, संभाव्य गैरप्रकारांना आळा बसेल. साध्या वेशात गुन्हे शाखेची पथके पालखी सोहळ्यात होणार्‍या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेकडून साध्या वेशात 250 कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

त्यांची विशेष पथके तयार करण्यात आली आहे. सराईत चोरट्यांची यादी तयार करून त्यांची फोटोद्वारे माहिती जमा करण्यात आली आहे. मुक्कामांच्या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास महिला पोलिसांची पथके वारी सोहळ्यात पहारा देणार आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.

वारी सोहळ्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताचे चोख नियोजन करण्यात आले आहे. दोन सत्रांत पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. सात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ड्रोन व जीपीएसद्वारे पालखीचे लाईव्ह लोकेशन आपल्याला समजणार आहे. वाहतूक व स्थानिक पोलिसांच्या समन्वयातून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page