माऊली नामाचा जयघोष…..टाळ्यांचा प्रचंड कडकडाट
” या या दिव्याच्या घाटात, माऊली चालती थाटात ” … या रचनेप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लाखो वैष्णव जनांसह माऊली नामाच्या जयघोषात आणि टाळ मृदूंगाच्या गजरात दिवे घाटाची अवघड चढण चढून बुधवारी ( दि १४ ) सायंकाळी पाचच्या सुमारास पुरंदर तालुक्यात दाखल झाला.
घाटावर उपस्थित हजारो माऊली भक्तांनी हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवाला. यावेळी घाटाच्या शेवटच्या टप्प्यात माऊलींच्या पालखी रथावर पुरंदरकरांच्या वतीने पुषवृष्टी करण्यात आली तसेच टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात माऊलींच्या पालखी सोहळ्याचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले.
पुरंदर तालुक्यातील हजारो भाविक बुधवारी माउलींच्या दर्शनासाठी व स्वागतासाठी ठिकठिकाणी थांबले होते. वडकी येथील विसाव्याच्या ठिकाणी पाऊणतास विश्रांती घेतल्यानंतर दुपारी चारच्या दरम्यान पालखी सोहळ्याने दिवे घाट चढवायला सुरूवात केली.
ठिक पाच वाजता घाट चढून आल्यावर झेंडेवाडी येथील विसाव्याच्या ठिकाणी सव्वापाच वाजता पालखी विसावली.
यावेळी आमदार संजय जगताप, माजी मंत्री दादा जाधवराव, बाबाराजे जाधवराव, बबनराव पाचपुते, दौड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांसह सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व जिल्हा परिषद व समितीचे पदाधिकारी, दिवे पंचक्रोशीतील गागोगावचे सरपंच, सदस्य आदी मान्यवरांनी सोहळ्याचे स्वागत केले.
झेंडेवाडी नंतर काळेवाडी, ढुमेवाडी, दिवे, पवारवाडी या ठिकाणी ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत करत दर्शनाचा लाभ घेतला.
माऊलींच्या रथाला मानाच्या बैलजोडी बरोबर स्थानिक शेतक-यांच्या चार बैलजोड्यांनीही रथ ओढण्यास मदत केली.
हा सोहळा घाटाच्या अंतिम टप्प्यात असताना घाटावरील भाविकांनी हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. यावेळी माऊली नामाचा जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते.
माउलींचा पालखी रथ शेवटचा टप्पा ओलांडून पुरंदरच्या हद्दीत प्रवेश करताना ” माऊली … माऊली … ” नामाचा जयघोष, फुलांची उधळण आणि टाळ्याच्या प्रचंड कडकडाटात माऊलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
यानंतर झेंडेवाडी येथील विसाव्याच्या ठिकाणी काहीवेळ हा सोहळा विश्रांतीसाठी थांबला. यावेळी हजारो वारक-यांनी घाटमाथ्यावर काहीवेळ विश्रांती घेतली.
पुढील मार्गावर विविध व्यक्ती, सामाजिक संस्थांच्या वतीने रस्त्यात ठिकठिकाणी वारक-यासाठी पाणी, चहा, फराळाचे साहित्य वाटले जात होते. तरुण, विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने वहातुक व्यवस्था पहात होते. अनेक ठिकाणी वारक-याच्या सेवेसाठी औषधांची, पाणी पुरवठ्याची सोय केली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्यात तरुणाईचे प्रमाण लक्षणीय दिसत होते.
.. दरवर्षी माऊलींचा पालखी सोहळा पुरंदर तालुक्यात दाखल होताना लाखो वारक-यांसह वरूणराजाचीही उपस्थिती असते. यंदा मात्र वरुणराजाने उपस्थिती दाखवली नाही. मात्र अभंगाचे सूर आणि टाळ मृदूंगाच्या गजराने घाट परिसर दुमदुमून गेला होता.