चेष्टा-मस्करीच्या कारणातून झालेल्या वादात, कोयत्याने वार

Photo of author

By Sandhya

कोयत्याने वार

चेष्टा-मस्करीच्या कारणातून झालेल्या वादात पाच जणांच्या टोळक्याने दोघा भावांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर एकाच्या डोक्यात, हाता-पायावर कोयत्याने वार केले.

ऋषी बर्डे आणि आदित्य बर्डे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आदित्य बर्डे (वय 22, रा. संतोषनगर, कात्रज) याने दिलेल्या फिर्यादीनुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आदित्य विशाल गोसावी (वय 20),

राज राकेश परदेशी (वय 23), ओमकार चंद्रकांत सावंत (वय 18, तिघे रा. धनकवडी) या तिघांना अटक केली, तर एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. ही घटना 13 जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भारती विद्यापीठ बँक मार्केटजवळील चहा हाईट येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य बर्डे आणि त्याचे मित्र केतन कोंढरे, हर्षल खिलारे हे धनकवडी येथील चहा हाईट येथे चहा पीत थांबले होते.

त्या वेळी चेष्टामस्करीच्या कारणातून झालेल्या वादात आरोपींनी गैर-कायद्याची मंडळी जमवून आदित्य आणि त्याचा भाऊ ऋषी या दोघांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर टोळक्याने जिवे मारण्याची धमकी देत डोक्यावर, हाता-पायावर धारदार हत्याराने वार केले.

टोळक्याच्या हल्ल्यात ऋषी हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद कोयताधारी टोळक्याकडून तरुणावर केलेल्या हल्ल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. आरोपी त्वेषाने तरुणावर कोयत्याने वार करीत आहेत.

Leave a Comment