PUNE : पुणेकरांच्या पाणीसंकटात आणखी वाढ होण्याची शक्यता

Photo of author

By Sandhya

पुणेकरांच्या पाणीसंकटात आणखी वाढ होण्याची शक्यता

जून महिना अर्धा संपला, तरी खडकवासला धरणसाखळी परिसरात पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुणेकरांवरील पाणीसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत.

हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार पुण्यात 22 जूनपर्यंत मान्सून सक्रीय होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसांत पडणारा पाऊस, तसेच जुलैमधील पावसाचा अंदाज घेतला जाणार आहे.

त्यानुसार शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत जूनअखेरीस आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी दिली.

दरम्यान, मागील वर्षी जूनमध्ये सुमारे 127 मिमी पाऊस झाला होता. मात्र, यावर्षी अद्याप 10 मिमी पाऊसही झालेला नसल्याचे आयुक्‍तांनी यावेळी सांगितले.

खडकवासला धरणसाखळीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा थोडा जादा पाणीसाठा असला, तरी मागील वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच धरणातील पाणीसाठ्यात वाढ सुरू झाली होती.

मात्र, यावर्षी पूर्वमोसमी पाऊस झाला नाहीच, शिवाय मान्सूनही अद्याप दाखल झालेला नाही. त्यामुळे धरणातील पाणी शहर तसेच जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी हे पाणी ऑगस्ट अखेरपर्यंत नियोजन करणे अपेक्षित आहे.

त्यामुळे महापालिकेकडून हवामान विभागाशी संपर्क साधत पावसाची स्थिती लक्षात घेतल्यानंतर पुन्हा शहराच्या पाण्याच्या आढावा घेतला जाणार आहे.

सध्या शहरात प्रत्येक गुरुवारी पाणी बंद ठेवले जात असून जून अखेरीस धरणांतील पाणीसाठा आणखी खालावल्यास जुलैमध्ये शहरात दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन महापालिकेकडून सुरू आहे. त्यानुसार वेळापत्रकही तयार केले आहे.

हवामान विभागाने दि.22 जूनपासून पुण्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानंतर आठवडाभर पावसाची स्थिती लक्षात घेऊन जून अखेरीस पाणीसाठ्याचा तसेच पाणी पुरवठ्याचा आढावा घेतला जाईल.

त्यानंतर पाणीकपातीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे प्रशासक तथा मनपा आयुक्‍त विक्रम कुमार म्हणाले.

Leave a Comment