आषाढी यात्रेसाठी येणार्या जास्तीत जास्त भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, यासाठी परंपरेनुसार मंगळवार, दि. 20 पासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे 24 तास मुखदर्शन, तर 22.15 तास पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी 11 वाजता श्री विठ्ठलाचा पलंग काढण्यात आला आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड देण्यात आला आहे; तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे.
त्यामुळे मंगळवारपासून पुढील 15 दिवस भाविकांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी न थकता उभे राहणार आहेत.
दरम्यान, देवाचा पलंग काढण्यात आल्यामुळे राजोपचार बंद करण्यात आले आहेत. देवाला एकवेळ महानैवेद्य आणि केवळ लिंबू पाणी दिले जात आहे. आषाढी यात्रेसाठी 15 ते 18 लाख भाविक पंढरीत येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.
या सर्व भाविकांना विठ्ठल दर्शन मिळावे, यासाठी आषाढ शुद्ध प्रथमा या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत विठ्ठलदर्शन 24 तास सुरू ठेवण्यात येते. त्यामुळे 24 तास दर्शन सुरू झाले आहे.
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत मागील दोन दिवसांपासून आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात भाविकांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. सध्या अधिक मासामुळे भाविकांची गर्दी होताना दिसून येत आहे.
भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत. त्या द़ृष्टिकोनातून पूर्वीच्या परंपरेप्रमाणे आषाढी प्रतिपदेपासून देवाचा पलंग काढण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळी 11 वाजता विधिवत पूजा करून देवाचा पलंग काढला आहे. पलंग काढताच भाविकांना विठुरायाचे 24 तास दर्शन मिळेल, अशी सोय करण्यात आली आहे