वयाची अठरा वर्षे पूर्ण नसतील, तर वाहन चालवता येणार नाही, हा वाहतुकीचा नियम धाब्यावर बसवून अल्पवयीन दुचाकी रायडर्स शहरात सुसाट धावत आहेत. शालेय व नुकत्याच कॉलेजात दाखल झालेली मिसरूड न फुटलेली ही मुले भाऊ, वडील, काका, मामा किंवा मित्राची दुचाकी घेतात.
वर्दळीच्या भागात सर्रासपणे धूम स्टाईल बाईक पळवतात. या मुलांकडून वेगमर्यादा ओलांडली जात असल्याने इतर वाहनचालकांत भय निर्माण होत आहे. या सुसाट ‘टीनएजर्स’मुळे आरटीओ, वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
अल्पवयीन वाहनचालकांकडे कुठलाही वाहन परवाना नसतो. शाळा व कॉलेज परिसरात ही अल्पवयीन मुले वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात दिसतात. अनेक ठिकाणी काही क्षणात येतात व कट मारून जातात. त्यांना दुसर्यांच्या जीवाची पर्वा नसते. वेगमर्यादा ओलांडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारत येत नाही.
राज्य अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यातील अवघ्या सहा दिवसांत 16 दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहेत. यात सर्वाधिक तरुण असल्याचे समोर आलेले आहे. नवीन दुचाकी शिकलेले आणि शिकत असलेल्या मुलांकडून जोराने गाडी पळविणे, रायडींग करण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.
अल्पवयीन रायडर्सला रोखणे आता आरटीओ, वाहतूक पोलिसांसमोर नवे आव्हान ठरत आहे. पुणे शहरातील ज्या मुख्य रस्त्यांवर वाहतूक पोलिस आणि आरटीओची गस्त असते.
अशा ठिकाणी हे अल्पवयीन रायडर्स गाड्या चालवत नाहीत. मात्र, पोलिस ज्या ठिकाणी नसतात, त्या ठिकाणी मोटार वाहन कायद्याचे, वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होते. अशा वाहनचालकांमुळे दुसर्याचा नाहक बळी जाण्याची शक्यता आहे.
…तर पालकांना शिक्षा गाडी चालवताना अल्पवयीन मुलांकडून अपघात घडल्यास मोटार वाहन कायदा कलम 199 अ नुसार त्याच्या पालनकर्त्यावर आणि वाहनमालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
त्यात मुलाची कोणतेही बाजू ग्राह्य धरली जाणार नसून, पोटकलम(1 व 2) नुसार पालनकर्ता, गाडी मालकास तीन वर्षे तुरुंगवास आणि 25 हजारांचा दंड होईल. पोटकलम 4 नुसार वाहनाची नोंदणी 12 महिन्यांसाठी रद्द केली जाईल. त्यानंतर पोटकलम 8 व 9 नुसार अपराध केलेल्या अल्पवयीन मुलाला 25 वर्षे वय पूर्ण करत नाही, तोपर्यंत त्याला परवाना दिला जाणार नाही.