लष्कर भागातील दस्तूर मेहेर रस्त्यावरील एका घराचे छत कोसळून एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 26) रात्री घडली. स्टॅनली डिसोझा (वय 50, रा. 830, दस्तूर मेहेर रस्ता, लष्कर) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे,
तर जेरी डिसोझा (वय 60, रा. 830, दस्तूर मेहेर रस्ता, लष्कर) गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. लष्कर भागातील दस्तूर मेहेर रस्त्यावरील एका दुमजली इमारतीत डिसोझा कुटुंबीय वास्तव्याला होते.
शहरात गेले तीन दिवस पाऊस सुरू आहे. डिसोझा यांच्या घराच्या छतातून सकाळी माती पडली. त्यानंतर जीर्ण वासे सैल झाल्याचा आवाज आला. त्यानंतर रात्री छप्पर कोसळले. स्टॅनली आणि जेरी ढिगार्याखाली सापडले.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी ढिगारा बाजूला करून जेरी आणि स्टॅनली यांना बाहेर काढले. त्यांना रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच स्टॅनली यांचा मृत्यू झाला होता.