PUNE : लाखो रुपयांचा खर्च करूनही पहिल्याच पावसाने रस्त्यांची दुर्दशा

Photo of author

By Sandhya

लाखो रुपयांचा खर्च करूनही पहिल्याच पावसाने रस्त्यांची दुर्दशा

पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करूनही पहिल्याच पावसाने सिंहगड रस्त्यासह कोल्हेवाडी, धायरी, दळवीवाडी येथील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

थोड्या पावसातही परिसरातील रस्ते पाण्याखाली बुडाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.

पुणे-पानशेत रस्ता, सिंहगड रस्ता या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही पहिल्याच पावसात पाण्याची डबकी साचल्याने वाहनचालकांसह नागरिक व पर्यटकांचे हाल झाले. लगड मळ्यात सिंहगड रस्त्यावर शनिवारी (दि.24) सर्वांत गंभीर स्थिती निर्माण झाली होती.

या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने जवळपास शंभर मीटर अंतराचा रस्ता पाण्याखाली बुडाला. त्यामुळे दुचाकीस्वारांना पदपथांचा आधार घ्यावा लागला.

रस्त्यावर पाणी तुंबल्याने वाहतूक बंद पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड यांनी तातडीने नाले सफाई विभागाला या ठिकाणच्या पाण्याच्या निचरा करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानंतर कनिष्ठ अभियंता निष्णात छापेकर यांच्या देखरेखीखाली दहा, बारा कामगारांना भरपावसात पाण्याचा निचरा होण्यासाठी चेंबरची सफाई सुरू केली. किरकटवाडी व खडकवासला गावच्या हद्दीवरील कोल्हेवाडी रस्त्यावर माती, गाळाच्या थरासह पाण्याची डबकी साचली आहेत.

यामुळे वाहनचालक व नागरिकांना कसरत करावी लागत आहे. धायरी रस्त्यावरील गल्ली क्रमांक 17मधील अंतर्गत रस्ता पाण्याखाली बुडाला होता. यामुळे रहिवाशांना मोठी कसरत करावी लागल्याचे खडकवासला भाजप ओबीसी आघाडीचे अध्यक्ष अतुल चाकणकर यांनी सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page